रेल्वे प्रशासनाच्या धडपडीनंतरही त्या प्रवाशाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:27+5:302021-09-09T04:34:27+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : रेल्वेने चेन्नईवरून गोंदियाला जाणाऱ्या एका प्रवाशाची मंगळवारी रेल्वे प्रवासातच अचानक तब्बेत बिघडली. त्याला दवाखान्यात दाखल ...
घनश्याम नवघडे
नागभीड : रेल्वेने चेन्नईवरून गोंदियाला जाणाऱ्या एका प्रवाशाची मंगळवारी रेल्वे प्रवासातच अचानक तब्बेत बिघडली. त्याला दवाखान्यात दाखल करण्यासाठी व त्याचा जीव वाचविण्यासाठी येथील रेल्वे प्रशासनाने जी धडपड केली, त्या धडपडीची नागभीडमध्ये चांगलीच चर्चा आहे.
राहुल बांदेवार (२३) असे या प्रवाशाचे नाव आहे. व्यापाराच्या उद्देशाने हा प्रवासी चेन्नईला गेला होता. आपले काम आटोपून तो दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या चेन्नई बिलासपूर (०८२३२) या गाडीतील एस १ या बोगीत बसला. मात्र, काही वेळानंतर या प्रवाशाची तब्बेत अचानक बिघडली. दरम्यान, राहुलचे कुटुंब राहुलच्या संपर्कातच होते. आपली आपबिती राहुलने कुटुंबीयांजवळ सांगितली. कुटुंबीयांनी लागलीच रेल्वे विभागाशी संपर्क साधून राहुलवर उपचाराविषयी विनंती केली.
दरम्यान, विभागानेही गाडीतील प्रशासनास ही माहिती विशद केली, तोपर्यंत ही गाडी बल्लारपूरपर्यंत आली होती. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर राहुलवर जुजबी उपचार केल्याची माहिती आहे. मात्र, या गाडीने बल्लारपूर सोडल्यानंतर राहुलची तब्बेत आणखी जास्त बिघडली, तोपर्यंत नागभीड स्थानक आले आणि कधीही नागभीडला न थांबणारी गाडी थांबली.
गाडी थांबताच रेल्वे प्रशासन सतर्क झाले. तातडीने रेल्वेचे डॉक्टर बोगीत गेले आणि राहुलची तपासणी केली. आणि शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर, लगेचच राहुलला येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, पण त्याची एकंदर परिस्थिती लक्षात घेता, ग्रामीण रुग्णालयाकडून मोठ्या रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. शेवटी रेल्वे प्रशासनाने त्याला तातडीने ब्रह्मपुरी येथे हलविले. मात्र, ब्रह्मपुरीला नेत असताना राहुलचा रस्त्यातच मृत्यू झाला, तरीही मृत्यूची खातरजमा करण्यासाठी म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनी ब्रह्मपुरी येथील एका दवाखान्यात राहुलला घेऊन गेलेच, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, नंतर रेल्वे प्रशासनाने मृत्यूनंतर जे काही सोपस्कार असतात. ते सोपस्कार पार पाडून प्रवाशाचे पार्थिव नातेवाइकांच्या स्वाधीन केले.