निवाऱ्याअभावी प्रवाशांना पावसात बघावी लागते बसची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:33 AM2021-08-14T04:33:20+5:302021-08-14T04:33:20+5:30
चंद्रपूर : सध्या पावसाचे दिवस आहे. प्रवास करताना प्रवाशी रस्त्याच्या कडेला प्रवासी निवाऱ्याचा शोध घेतात. मात्र, गावागावांतील प्रवासी निवाऱ्याची ...
चंद्रपूर : सध्या पावसाचे दिवस आहे. प्रवास करताना प्रवाशी रस्त्याच्या कडेला प्रवासी निवाऱ्याचा शोध घेतात. मात्र, गावागावांतील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाल्यामुळे थांबायचे कुठे, असा प्रश्न सध्या प्रवाशांना पडला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ, तसेच जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन दुर्लक्षित प्रवासी निवाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.
कोरोना संकटानंतर आता पूर्ण क्षमतेने एसटी सुरू झाली आहे. सामान्य नागरिकांना प्रवासासाठी मुख्य साधन एसटीच आहे. ग्रामीण भागातून हजारो नागरिक दररोज एसटीने प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्याच्या कडेला प्रवासी निवारे आहे. मात्र, जिल्ह्यातील अधिकाधिक प्रवासी निवारे दुर्लक्षित असून बसण्यासाठी सुविधाही नाही. देखभाल व दुरुस्तीअभावी अनेक प्रवासी निवारे धूळ खात पडले आहेत.
प्रवासी निवाऱ्यांमुळे प्रवाशांना बसची प्रतीक्षा करीत असताना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळते. मात्र, संबंधित विभागाने देखभाल व दुरुस्ती करणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी सुस्थितीत प्रवासी निवारे आहे. मात्र, अस्वच्छमुळे प्रवासी तिथे न बसता, बाहेर कुठेतरी वृक्षाचा आधार घेऊन एसटीची वाट बघतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्रवासी निवाऱे अद्यावत करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
कोट
जिल्ह्यातील बहुतांश गावातील प्रवासी निवारे दुर्लक्षित आहे. त्यामुळे या निवाऱ्यांची दुरुस्ती करून प्रवाशांना सुविधा देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिक आजही एसटीनेच प्रवास करतात. त्यामुळे त्यांना एसटीची वाट बघण्यासाठी प्रवासी निवाऱ्याचा सहारा घ्यावा लागतो. मात्र, काही ठिकाणी प्रवासी निवारा नसल्याने त्यांचे हाल होते. शासनाने लक्ष देऊन गाव तिथे प्रवासी निवारा बांधावा.
- पारस पिपंळकर, संपर्क प्रमुख, अखिल भारतीय सरपंच परिषद
कोट
जिल्ह्यातील ग्रामीण, तसेच दुर्गम भागातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी एसटीचा आधार आहे. मात्र, प्रवासी निवाऱे सुस्थितीत नसल्यामुळे अनेक वेळा रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांचा त्यांना आधार घ्यावा लागतो. पावसाच्या दिवसामध्ये नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रवासी निवाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
-विवेक बोरिकर, संयोजक, भूमिपत्र बिग्रेड चंद्रपूर.