गुडघाभर चिखलातून पादाक्रांत करावा लागतो मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:34 AM2021-09-16T04:34:17+5:302021-09-16T04:34:17+5:30
आशिष खाडे पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील शेतातील रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. काही शेतात तर शेतकऱ्यांना पावसाच्या ...
आशिष खाडे
पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील शेतातील रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. काही शेतात तर शेतकऱ्यांना पावसाच्या काळात जाणे खूपच कठीण होते. येथे डांबरी रस्ता व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला अनेकदा अर्ज, विनंत्या केल्या. परंतु अजूनही रस्ता झालेला नाही. विशेष म्हणजे याच रस्त्याने पूर्वी पळसगाव येथील नागरिक कोठारी येथील आठवडी बाजारालादेखील जात होते. परंतु या चिखलामुळे आता शेतात जाणेदेखील कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांनी यापूर्वी तहसीलदार यांनादेखील अर्ज केला होता. तलाठी, तहसीलदार राईंचवार हा रस्ता पाहण्यासाठी स्वतः गेले होते. त्या शिवारातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर झालेले अतिक्रमण व रस्त्याची दुर्दशा दाखवून दिली. तेव्हा आपण काहीतरी मार्ग काढू, असे तहसीलदार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले व तहसीलदार यांनी त्या रस्त्यावर दोन, तीन ट्रॅक्टर मुरूमही टाकून दिला होता. परंतु पुन्हा पावसाच्या पाण्याने रस्ता जसाच्या तसा चिखलमय झाला आहे.
तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काट्यांच्या झाडांमुळे रस्ता पूर्णतः झाकलेला आहे. संबंधित रस्त्याने रोज शेतात जाणारे शेतकरी अनेक आहेत. शेती म्हटले तर अनेक अवजारे लागतात. ती अवजारे शेतकऱ्यांना पूर्ण अंगावर वहावी लागतात. याचबरोबर शेतात टाकण्यासाठी लागणारे खतदेखील डोक्यावरच न्यावे लागते. त्यामुळे ते ओझे डोक्यावर घेऊन ज्या रस्त्याने बैलदेखील जायला धजावत नाहीत, अशा रस्त्यांनी शेतकऱ्यांना चिखल पायी तुडवत मार्ग काढावा लागतो. रस्ता असा असल्यामुळे या शेतात शेतमजूरदेखील यायला तयार नाहीत.
त्यामुळे संबंधित विभागाने आताच पक्का रस्ता बांधावा, अशी मागणी गणेश कौरासे, महादेव खाडे, तुकाराम वासाडे, राजू वासाडे, यश वासाडे, अभिषेक कोंडेकर, गोविंदा खाडे, ऋषीदेव वासाडे, पद्माकर देरकर, अंकुश कोंडेकर, विनोद राऊत, विनोद लोडे यांनी केली आहे.
150921\img-20210831-wa0035.jpg~150921\img-20210831-wa0021.jpg
caption~caption