ओपीडीत रुग्णांची रीघ; मात्र डॉक्टर बोटावर मोजण्याइतके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:09 AM2017-09-11T00:09:38+5:302017-09-11T00:10:16+5:30

चंद्रपूर औद्योगिक जिल्हा असल्यामुळे अलिकडच्या काळात विविध आजारांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात.

Patients of OPD; Just count the doctor on the finger | ओपीडीत रुग्णांची रीघ; मात्र डॉक्टर बोटावर मोजण्याइतके

ओपीडीत रुग्णांची रीघ; मात्र डॉक्टर बोटावर मोजण्याइतके

Next
ठळक मुद्देतोंडी सांगण्यावरून उपचार : रुग्णांसाठी डॉक्टरांजवळ वेळच नाही

रवी जवळे/ परिमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर औद्योगिक जिल्हा असल्यामुळे अलिकडच्या काळात विविध आजारांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंतच ओपीडी सुरू राहत असल्याने रुग्णांची रिघ लागली असते. मात्र त्यांची तपासणी करून उपचार करण्यासाठी विविध विभागाचे बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर उपलब्ध राहत असल्याने रुग्णांना प्रापर वेळ दिला जात नाही. रुग्णांची व्यथा ऐकून, त्याची तपासणी करून योग्य आणि दीर्घ काळ टिकणारा उपचार करण्याऐवजी ओपीडीच्या ठराविक वेळेत आलेल्या रुग्णांचा लोंढा ‘निपटवण्या’वरच भर दिला जात आहे.
चंद्रपूरला मेडीकल कॉलेज झाले. त्या अनुषंगाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ बदलणे म्हणजे तो दर्जा येणे अपेक्षित होते. मात्र दुर्दैवाने तसे अद्यापही झालेले नाही. त्यामुळे आता रुग्णांना आरोग्य सेवा देताना अनेक समस्या निर्माण होत आहे. रुग्णालयातील ओपीडी म्हणजे सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विभाग. रुग्ण आणि उपचार यामधील सर्वात पहिली पायरी हीच. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी ८ ते दुपारी १२, असा ओपीडीचा ठराविक वेळ आहे. रुग्ण अधिक असले तर कधी एखादा तास आणखी ओपीडी सुरू राहते. रुग्णालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दररोज येथील ओपीडीमध्ये दीड हजारांहून अधिक रुग्ण तपासणी व उपचारासाठी येतात. या हजारो रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे, प्रसंगी अ‍ॅडमीट करणे, या सर्व गोष्टी ओपीडीच्या चार तासात कराव्या लागतात.
वैद्यकशास्त्रानुसार रुग्णांचा त्रास जाणून घेणे, त्याची तपासणी करणे, संशयित आजाराबाबतचे लक्षणे जाणून घेत काही प्रश्नांचीही उत्तरेही समजून घेणे, हे सर्व करताना एका रुग्णामागे डॉक्टरांना १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. डॉक्टरांना मेडीकलचा अभ्यासक्रम पूर्ण करताना असेच समिकरण शिकविले जाते. मात्र सामान्य रुग्णालयात येणाºया रुग्णांची संख्या अधिक आणि डॉक्टरांची उपलब्धता कमी असल्यामुळे रुग्णांना एवढा वेळ कधीच दिला जात नाही. इच्छा असूनही डॉक्टरांचा नाईलाज असतो, असे तेथीलच एका डॉक्टरने लोकमतशी बोलताना सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात जनरल मेडीसीन, सर्जरी, अस्थीरोग विभाग, कान, नाक, घसा विभाग, बालरोग विभाग, त्वचा रोग विभाग, स्त्री रोग विभाग, दंत रोग विभाग, नेत्र रोग विभाग, आयुष यासह इतर आणखी काही विभाग आहेत. ओपीडीत येणारे रुग्ण या विविध विभागाशी निगडित असतात. मात्र रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ओपीडीसाठी या विविध विभागात कार्यरत डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करता यावी म्हणून रुग्णाला दोन-तीन मिनिटातच तपासणी करून मोकळे केले जाते.
काही रुग्ण प्रथमदर्शिनी किरकोळ आजाराचे दिसत असतील तर त्याला एका मिनिटाच्या आतच उरकविले जाते. या सर्व भानगडीत रुग्णांना त्याच्या आजाराशी संबंधित दीर्घ काळ टिकणारा उपचार मिळत नाही. कधी तर त्याला होणारा त्रासही पूर्णपणे ऐकून घेतला जात नाही. या सर्व प्रकारामुळे रुग्णांना पुन्हा वारंवार रुग्णालयात यावे लागते अथवा नाईलाजाने खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करावा लागतो.

ग्रामीण भागासारखी सायंकाळी ओपीडी का नाही ?
चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णालयातील ओपीडी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळात सुरू राहते. सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते ६ असा वेळ असतो. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात ओपीडी केवळ सकाळी चार तासच सुरू राहते. वास्तविक ग्रामीण भागात रुग्णांची संख्या कमी असते. तरीही तिथे दोन वेळा ओपीडी सुरू ठेवली जाते. त्या तुलनेत सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या लक्षणीय असताना ओपीडीचा वेळ केवळ सकाळी एकदाच का, असा प्रश्न उपस्थित होतो. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सायंकाळीदेखील काही वेळासाठी ओपीडी सुरू ठेवण्याची गरज व्यक्त होणे स्वाभाविक आहे.

वक्तशीरपणाचा
अभाव
बाह्य रुग्ण विभागात आलेल्या रुग्णांना त्यांना जडलेल्या आजारानुसार संबंधित विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे वर्ग केले जाते. मात्र येथील काही विभागातील डॉक्टर ओपीडी सुरू झाल्यानंतर तब्बल एक-दीड तासांनी ओपीडीत येतात, असेही लोकमतच्या पाहणीत आढळून आले. त्यामुळे आधीच ओपीडीसाठी वेळ कमी असताना रुग्णांना डॉक्टरांची प्रतीक्षा करीत ताटकळत रहावे लागते.

Web Title: Patients of OPD; Just count the doctor on the finger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.