कोरोनाच्या धास्तीने तपासणी करण्यास रुग्णांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:28 AM2021-04-22T04:28:56+5:302021-04-22T04:28:56+5:30
गोवरी : गोवरी येथे गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू आहे. सोबतच कोरोनाचा धोका वाढत असल्याने आरोग्य ...
गोवरी : गोवरी येथे गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू आहे. सोबतच कोरोनाचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाच्यावतीने रुग्णांची ॲन्टिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोविडच्या धास्तीने तापाने आजारी असलेल्या गावातील बहुसंख्य नागरिकांनी साहेब, आता आमची प्रकृती बरी आहे, आमची तपासणी करू नका, अशी विनंती नागरिक करू लागले आहेत.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली (बु.) च्या वतीने वैद्यकीय अधिकारी विपीनकुमार ओदेला यांच्या मार्गदर्शनात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. गावात मोठ्या प्रमाणात तापाची साथ व कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेता गावातील नागरिकांची ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. तीन दिवस घेतलेल्या या शिबिरात ५७ नागरिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले; तर ८५ रुग्ण ॲक्टिव्ह असल्याची माहिती समोर आली. आता गावात तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने दहशत पसरली आहे. गावात कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेता, नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे; परंतु ॲन्टिजन चाचणीत आपल्यालाही कोविड निघेल, या भीतीपोटी नागरिक ॲन्टिजन चाचणी करायला नकार देत आहेत.