रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा; माजी मंत्री वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
By राजेश भोजेकर | Published: May 24, 2023 02:13 PM2023-05-24T14:13:08+5:302023-05-24T14:13:57+5:30
विदर्भात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून येथील शेतकरी लाखो टन धानाचे उत्पादन दरवर्षी घेतात.
चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा याकरिता आधारभूत धान खरेदी व त्यावरील बोनस असा दुहेरी लाभ देण्यात येत होता. मात्र त्यानंतरच्या काळात आधारभूत धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्था व उपअभिकर्ता यांना नियमान्वये लादण्यात आलेल्या जाचक अटींमुळे अखेर सहकारी संस्था व उपअभिकर्ता यांनी आधारभूत धान खरेदी बंद करण्यात येत असल्याबाबतचे निवेदन राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांना दिले. या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता सकारात्मक चर्चा केली. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकर आदेश काढणार असल्याची प्रतिक्रिया दिल्याने रब्बी हंगामातील आधारभूत धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टळले.
विदर्भात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून येथील शेतकरी लाखो टन धानाचे उत्पादन दरवर्षी घेतात. धान पीक घेताना मशागत व लागवडी खर्च अधिक असतानाही धानाला रास्त भाव मिळत नाही. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड हलाखीची असून शेती व्यवसाय मोडकळीस आला आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव व सोबत बोनस असा दुहेरी लाभ दिला. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक समस्या निकाली काढण्यासाठी मदत झाली. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्र व उपअभिकर्तांना प्रती क्विंटल मागे अर्धा किलो तूट, संस्थेचे दहा लक्ष रुपये अनामत भरणे, तसेच ५० लक्ष रुपयांची बँक गॅरंटी अशा जाचक अटींच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा आधारभूत धान खरेदी संघटनेने आवाज उचलत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांना निवेदनातून जाचक अटी शिथिल करण्यासंबंधी मागणी घातली. अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र द्वारे धान खरेदी होणार नसल्याचेही निवेदनातून व्यथा व्यक्त केली.
आधारभूत धान खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी न केल्यास यातून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल व शेतकरी पूर्णतः उदध्वस्त होणार असा दूर दृष्टिकोनातून विचार करून माजी मंत्री वडेट्टीवार यांनी मुंबई गाठून राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांची समक्ष मांडल्या. यावर राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक चर्चेतून सेवा सहकारी संस्था व उपअभि करता यांचेवर लादण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करून लवकरच आदर काढणार असल्याची प्रतिक्रिया पर माहिती दिली. यामुळे आगामी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील आधारभूत धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच यासंबंधीचे आदेश निघणार आहेत. शेतकरी हितासाठी नेहमीच आ. विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला असून आजच्या हिरीरी व अथक प्रयत्नामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना याचा नक्कीच लाभ होणार हे विशेष.