कोविडवर मात करणाऱ्या पॅबिप्लू......... गोळ्यांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:28 AM2021-04-22T04:28:36+5:302021-04-22T04:28:36+5:30
चंद्रपूर शहरात मार्च महिन्यापासून कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली. सौम्य आजार असणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांकडून पॅबिप्लू...... पॅव्हिपिराविर गोळ्यांची शिफारस केली ...
चंद्रपूर शहरात मार्च महिन्यापासून कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली. सौम्य आजार असणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांकडून पॅबिप्लू...... पॅव्हिपिराविर गोळ्यांची शिफारस केली जात आहे. मागील महिन्यात या गोळ्या चंद्रपुरातील कोणत्याही मेडिकल स्टोअर्समध्ये सहजपणे उपलब्ध होत्या. एप्रिल महिन्यात रुग्णवाढीने वेग धरला. तेव्हापासून या गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोविड रुग्णांसाठी पॅबिप्लू...... पॅव्हिपिरावीर ही गोळी अतिशय परिणामकारक ठरत असल्याचे शासकीय व खासगी डॉक्टरांचेही म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील खासगी कोविड रुग्णालयातील डॉक्टरांकडून हीच गोळी प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिली जात आहे. या गोळ्या उत्पादनानंतर चार महिन्यातच वापराव्या लागतात. परिणामी, मेडिकल स्टोअर्समध्ये यापूर्वी कुणी साठा केला नाही. या गोळ्यांच्या पॉकिटात एक फॉर्म दिला आहे. डॉक्टरांच्या लेखी परवानगी घेऊनच ही गोळा रुग्णांना देता येते.
कुटुंबातील अन्य सदस्यांची चिंता
ताप येणाऱ्या रुग्णाला पहिल्या दिवशी सकाळी ९ व रात्री ९ अशा २०० मि.ग्रॅमच्या १८ गोळ्या दिल्या जातात. त्यानंतर प्रत्येक दिवसानंतर या गोळ्यांचा डोस कमी होतो. या गोळ्यांमुळे गृह विलगीकरणातील रुग्णांमध्ये सुधारणा होत आहे. शहरात कोविड रुग्णवाढीचा वेग धक्कादायक आहे. त्यामुळे पॅबिप्लू...... पॅव्हिपिरावीर गोळ्यांची मागणी वाढली. एका कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह निघाला तर अन्य सदस्यांनाही बाधा होईल आणि गोळ्या मिळणार नाही, या धास्तीने काही रुग्णांचे कुटुंबीय गोळ्या विकत घेण्यासाठी भटकंती करू लागले, अशी माहिती एका औषध विक्रेत्याने ‘लोकमत’ला दिली.
नागरिकांनी घाबरू नये
चंद्रपुरात पॅबिप्लू......... पॅव्हिपिरावीर गोळ्यांची थोडी टंचाई आहे. मात्र, मागणीनुसार सध्या तरी पुरवठा थांबला नाही. याबाबत औषध विक्रेते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या विकत घेणे टाळावे, असे आवाहन चंद्रपुरातील औषध विक्रेत्यांनी केले.