बँकेत पोहोचलेल्या शेतकऱ्याला तातडीने कर्ज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:03 PM2018-06-06T23:03:11+5:302018-06-06T23:03:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहे. अशावेळी पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत व खाागी कुठल्याही बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. काही बँकसंदर्भात तक्रारी आल्या असून कोणत्याही कारणाशिवाय तातडीने शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी बुधवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्व बँक प्रतिनिधींना कठोर शब्दांमध्ये याबाबतचे निर्देश देण्यात आले. काही बँकांमध्ये कर्ज वाटप करत असताना नियमित कर्जदार, अनियमित कर्जदार, सातबारा किंवा अन्य कागदपत्रे नसणे, कर्जमाफीच्या वेगवेगळ्या टप्प्यातील थकबाकी असणे, नव्या कर्जदाराला प्राधान्य देणे अशा पद्धतीच्या तक्रारी जिल्ह्याच्या काही भागातून आल्या. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंतही अशा काही ठिकाणच्या तक्रारी गेल्या आहेत. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपामध्ये प्रत्येक बँकेकडून शंभर टक्के शेतकºयांना कर्ज वाटप झाले पाहिजे, हे लक्ष्य ठेवून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आज तातडीने जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.
राज्य शासनाने २०१८-१९ या वषार्साठी जिल्हयाचा कर्जवाटप आराखडा यापूर्वीच तयार केला आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्ह्याला पीक कर्जाचे १०३६.२६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा असताना शेतकºयांना कर्ज देण्यासाठी कोणतेही कारण सांगितले जाणे योग्य नसल्याचे सचिन कलंत्रे यांनी बजावून सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित होत्या. याशिवाय सर्व उपविभागीय अधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत या हंगामात पीक कर्ज मिळण्यापासून वंचित रहावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व महापौर अंजली घोटेकर यांनी केले.
या बैठकीला काही शेतकरी प्रतिनिधीही उपस्थित होते. जिल्हाभरातील काही बँकांमार्फत वेगवेगळ्या प्रकारे शेतकºयांची विभागणी करून कर्ज वाटप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी बँक प्रतिनिधींसोबत संवाद साधताना पेरणीच्या दिवसांमध्ये सर्वांना एकाचवेळी पेरणी करावी लागत असल्याने बँकेने अशाप्रकारे कोणावरही अन्यायाची भूमिका घेऊ नये. सर्वांना समानतेनेकर्ज वाटप करावे, असे स्पष्ट केले.
महसूल विभागाची मदत घ्यावी
शेतकºयांनीदेखील कोणतीही बँक कर्ज देण्यामध्ये अडचण निर्माण करीत असेल, महसूल विभागाच्या कागदपत्रांसाठी कर्ज नाकारत असेल तर शेतकºयांनी तालुका उपनिबंधक, तहसीलदार किंवा महसूल यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणेला शेतकऱ्यांना यावेळी कर्ज भेटण्यात कुठलीही अडचण जाऊ नये, यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे सातबारा किंवा तत्सम कुठल्याही कारणास्तव कुठलीही बँक अडचण निर्माण करत असल्यास शेतकऱ्यांनी हताश न होता महसूल विभागाची मदत घ्यावी, असेही जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी स्पष्ट केले आहे.