तेंदूपत्त्याची मजुरी रोख द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:21 AM2019-05-26T00:21:40+5:302019-05-26T00:22:18+5:30
कंत्राटदारांनी मागील वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी व रायल्टी दिली नाही. यामुळे मजुरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी हाच प्रकार सुरू असल्याचे दिसतात नागभीड, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील मजुरांनी रोख मजुरी देण्याची मागणी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कंत्राटदारांनी मागील वर्षी तेंदूपत्त्याची मजुरी व रायल्टी दिली नाही. यामुळे मजुरांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर्षी हाच प्रकार सुरू असल्याचे दिसतात नागभीड, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी वन क्षेत्रातील मजुरांनी रोख मजुरी देण्याची मागणी करीत आहेत.
ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार आहे. परंतु, ग्रामसभा स्वत: तेंदूपत्त्याचे संकलन करीत नाही तर तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट एखाद्या ठेकेदाराला देतात. तेंदूपत्ता व्यवसायात कंत्राटदाराला तोटा झाल्यास मजुरी व रॉयल्टी देत नाही. याचा अनुभव जिल्ह्यातील तेंदूपत्ता मजुरांना अनेकदा आला आहे. मागील वर्षी तर अनेक कंत्राटदारांनी मजुरीच दिली नाही. १५ दिवस उन्हात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना मजुरीवर पाणी फेरावे लागले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या होत्या. मात्र कंत्राटदारांनी तेंदूपत्त्याची मजूरी दिली नाही. तेंदूपत्त्याचा बाजार अस्थिर असतो. याचा फटका तेंदूपत्ता कंत्राटदाराला बसतो. यावर्षी तेंदूपत्ता कंत्राटदाराला फटका बसल्यास मजुरी बुडण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे मजुरी दिल्याशिवाय बाहेर गावाहून तेंदूपत्ता संकलनासाठी आलेले मजूर जाण्यास तयार नाहीत.
गतवर्षी कंत्राटदारांनी रायल्टी बुडविली होती. त्यामुळे जोपर्यंत कंत्राटदार रॉयल्टीची रक्कम देत नाही, तोपर्यंत तेंदूपत्त्याची उचल करू न देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे धाबा, गोंडपिपरी परिसरातील कंत्राटदारांची गोची झाली आहे. मागील वर्षी काही ग्रामसभांनी कच्चे करारनामे केले होते. त्याचा फटका ग्रामसभांना बसला होता. यावर्षी काही ग्रामसभांनी नोंदणीकृत करारनामे केले तर काही ग्रामसभांनी मात्र मागील वर्षीप्रमाणे साधे करारनामे केले आहेत. याचा फटका सदर ग्रामसभांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामसभा व्यावहारीक सावधगिरी बाळगत असल्याचे दिसून येते.
खरीप हंगामासाठी पैशाची गरज
जिल्ह्यातील चार तालुक्यात तेंदूपत्ता संकलन सुरू आहे. यातील काही गावांचे तेंदूपत्ता संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही मजूर तेंदूपत्त्याचा हंगाम आटोपून घराकडे परतत आहेत. तेंदूपत्ता हंगामातून कमावलेला पैसा शेतीसाठी खर्च केला जातो. खरीपपूर्व मशागतीच्या कामाला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. तेंदूपत्ता संकलनानंतर कंत्राटदार तेंदूपत्ता वाळवून वाळलेला तेंदूपत्ता गोदामात ठेवतात. त्यामुळे तेंदूपत्ता वाहतुकीला सुरुवात झाली आहे. यातून काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.