जिल्ह्यातील मनरेगा कामगारांची प्रलंबित मजुरी तत्काळ द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 01:44 PM2024-09-20T13:44:58+5:302024-09-20T13:48:17+5:30
सुधीर मुनगंटीवार : केंद्रीय ग्रामीण विकासमंत्र्यांनी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मजुरांची मजुरी काही महिन्यांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे कामगार हक्काच्या मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असून अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मजुरी तातडीने देण्याचे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिला. केंद्रीयमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून केंद्राशी संबंधित मजुरांची प्रलंबित मजुरी तात्काळ देण्याची विनंतीही त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजित महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपजिल्हाधिकारी (रो. ह.यो) शुभम दांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) फरेंद्र कुतीरकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, मजुरांना सात दिवसात मजूरी देण्याचा कायदा आहे. कष्टकरी गरीब कामगारांची मजुरी वेळेत देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात. काही महिन्यांपासून मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी ही शासन स्तरावर प्रलंबित असल्यामुळे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून कामगारांच्या मजुरीचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
बचतगट भवनाचे मॉडेल डिझाईन करा
महिलांच्या प्रभाग संघासाठी बचतगट भवन उभारण्याचे नियोजन असून बचत गट उभारताना स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष, सोलर व्यवस्था, वॉल कंपाऊंड, पेव्हींग ब्लॉक, बसण्यासार्टी खुर्थ्यांची व्यवस्था, भिंतीवर स्लोगन्स, विद्युत व्यवस्था, परिसर सौंदर्याकरण व महिलांचे उत्पादन विक्रीकरिता दुकान आदी व्यवस्था कराव्यात, अशीही सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.