वेतन आयोगाची रक्कम मिळालीच नाही
By admin | Published: February 21, 2016 12:35 AM2016-02-21T00:35:01+5:302016-02-21T00:35:01+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील हिवताप कार्यालयांतर्गत कार्यरत हंगामी मलेरिया फवारणी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग फरकाची ...
शासनाचे दुर्लक्ष : हंगामी मलेरिया फवारणी कर्मचाऱ्यांत असंतोष
वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील हिवताप कार्यालयांतर्गत कार्यरत हंगामी मलेरिया फवारणी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग फरकाची रक्कम मागील कित्येक महिन्यांपासून अदा करण्यात आली नाही. त्यामुळे या कामगारांमध्ये असंतोष पसरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील हिवताप कार्यालयातील अस्थाई मलेरिया हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग फरकाची रक्कम तातडीने मिळवून देण्याचे निर्देश सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांना दिले. त्याची दखल घेऊन सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांनी राज्यातील सर्व जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडून हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या रकमेचा प्रस्ताव पाठविल्याचे निर्देश दिले. त्यानुसार मलेरिया हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग फरकाची रक्कम मिळण्याबाबत प्रस्ताव संचालक आरोग्य सेवा संचलानालय मुंबई यांच्यामार्फत प्रधान सचिव आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांना सादर करण्यात आला.
परंतु मागील नऊ महिन्यापासून प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी प्रदान करण्यात आली नाही. गेल्या पाच वर्षांपासून सहाव्या वेतन आयोग फरकाची रक्कम हंगामी कर्मचाऱ्यांना मिळाली नसल्याने कर्मचारी मानसिक तनावाखाली जीवन जगत आहे. कर्मचाऱ्यांचे विनाकारण मानसिक व आर्थिक नुकसान करुन जीवन जगण्याचा प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे.
सदर प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारत अनुसूचित जाती परिषद तथा जनजाती कर्मचारी परिषद चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भा.गो. टिपले, उपाध्यक्ष अॅड.शैलेंद्र जिलटे, सरचिटणीस आचार्य गौतम दारुंडे, कार्याध्यक्ष दिलीप टिपले, सचिव दिलीप करलुके, संघटन सचिव प्रदीप कांबळे, मलेरिया फवारणी कर्मचारी तुकाराम हनवते, महादेव बदकी, देवीदास खोंडे, जोगेंद्र उताने आदींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)