पाणी पुरवठा योजनांची देयके १५ व्या वित्त आयोगातून होणार अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:41+5:302021-07-02T04:19:41+5:30
राजुरा : राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांची पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याची ...
राजुरा : राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांची पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासन निर्णय काढून दिली आहे. नुकतेच आमदार सुभाष धोटे यांनी ग्रामपंचायतींच्या पथदिव्याची आणि अन्य समस्या सोडविण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे ग्रामपंचायतींच्या पथदिव्याची, पाणी पुरवठा योजनेची देयके ग्रामविकास विभागाकडून भरण्याची आवश्यकता स्पष्ट केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी हा शासन निर्णय जाहीर केला आहे.
राज्यात सध्या कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके अदा न झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता, १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून पथदिव्याची देयके आणि पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने त्यांना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिव्यांची आणि पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करावयाची आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार असून, देयकांच्या पूर्ततेअभावी कोणत्याही गावात पथदिव्यांची वीज किंवा पाणीपुरवठा योजना खंडित होणार नाही, असे ना. मुश्रीफ यांनी सांगितले.