दारूबंदीमुळे गावात शांततेचे वातावरण

By admin | Published: April 9, 2015 01:21 AM2015-04-09T01:21:24+5:302015-04-09T01:21:24+5:30

१ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे. प्रारंभीच्या काळात अट्टल मद्यपींची मोठी पंचाईत झाली.

Peaceful atmosphere in the village due to drinking | दारूबंदीमुळे गावात शांततेचे वातावरण

दारूबंदीमुळे गावात शांततेचे वातावरण

Next

पेंढरी (कोके) : १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे. प्रारंभीच्या काळात अट्टल मद्यपींची मोठी पंचाईत झाली. मात्र नंतर त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आल्याने ते सावरू लागले आहेत. विशेष म्हणजे, दारुबंदीमुळे गावागावात शांततेचे वातावरण दिसून येत असून भांडणतंट्यांना आळा बसला आहे. एरव्ही गजबजलेल्या बाजारातील गर्दी मात्र ओसरल्याचे दिसून येत आहे.
श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या परिश्रमातून महिला व गुरुदेव सेवा मंडळाच्या सहकार्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारू-बिअरबारचे लायसन्स रद्द करून दारूबंदी केली. हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. सदर वार्ताहराने नेरी-नवरगाव- पेंढरी भागात फेरफटका मारला असता ३१ मार्चला शेवटच्या दिवशी देशीदारू बिअरबारमध्ये अफाट गर्दी आढळली. काही मद्यपींना विचारले असता रांगेत राहून सिनेमाची तिकीट घेतल्यासारखे दारूचे पव्वे दाम दुप्पट भावाने तेही सोबत पार्सल म्हणून घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर आतापर्यंत या गावात शांतता नांदत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर नेरी-नवरगाव बाजारात कित्येक वर्षापासून दारू-मटन व बाजार खरेदीसाठी येणाऱ्या पुरुषांची संख्या रोडावली असल्याचे निदर्शनास येत आहे. बाजारात पुरुषापेक्षा स्त्रियांचीच संख्या अधिक दिसत आहे. इतकेच नाहीतर बाजारातून एखादे वाहन खुलेआम चालवून घ्यावे, अशी कधी नव्हे एवढी मोकळी जागा बाजारात दिसून येत आहे.
गावातील चौक, रस्ते, व कार्यक्रमातही शांतता पसरली असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत जाणकारांचे मत घेतले असता आमच्या इतक्या वर्षात एवढे रिकामे रस्ते व शांतता कधीच पाहिले नसल्याचे सांगितले. तसेच या दारूबंदीमुळे व्यवसायिक म्हणाले, नाश्ता, चने-फुटाणे, उकळले अंडे, खर्रे पान खाणाऱ्यांची संख्याही कमी झालेली आहे. हे पदार्थ खाणारे एकच प्यालातील सुधाकररूपी मद्यपी आता साधे ढुंकूनसुद्धा पाहत नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यावर व कुटुंबावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मांस खाणाऱ्याचेसुद्धा प्रमाण कमी होईल. सध्या लग्न, वाढदिवस व इतर समारंभाचे दिवस आहेत. परंतु मदिराच नसल्याने ढोल-ताशा संदलच्या तालावर नाचणारे ‘तळीराम’ही नाचण्याची हिंमत करीत नाही. त्यामुळे नवरदेव - नवरीच्या वऱ्हातीला शोभाच दिसत नाही, असेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे वऱ्हातीला शोभा येण्यासाठी कित्येक ठिकाणी बच्चे कंपनी व महिला मंडळी नाचताना दिसत आहेत. वाद्याचा खर्च काढावा, यासाठीही काही ठिकाणी नाचगाणे होत आहेत. एकंदरीत दारूबंदीचा सर्वदूर परिणाम झालेला दिसून येत आहे. काही बाबतीत याचा विपरित परिणाम दिसून येत असेल, तरीही ही बाब चंद्रपूर जिल्ह्यात नक्कीच स्वागतार्ह आहे. दारूबंदीमुळे शासकीय कामातही मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे. (वार्ताहर)
दारूबंदीमुळे संदर्भच बदलले
चिरोली : चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या अंमलबजावणीमुळे दारू पिणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे दारू दुकान उघडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत चालत राहणारी वर्दळ बंद झाली आहे. गावातील एकमेव असलेल्या देशी दारूच्या दुकानावर पुरक व्यवसाय म्हणून चने-फुटाणे, पाणी पाऊच, पानठेले, भाजीपाला, मटन, मच्छी विक्रेते उपजिविका करीत होते. त्यांना घरी बसावे लागले आहे. तसेच परिसरातील गावागावातून दारूचे शौकीन सकाळपासून रात्रीपर्यंत येणे जाणे करून दुकानात व गावातही हजेरी लाावत असत. मित्र-मंडळी गप्पा गोष्टी, चौकाचौकात रस्त्या-रस्त्यावर भांडण-तंटे, मारामाऱ्या, वादविवाद यामुळे परिसर गजबजून जात असे. दिवसभर कष्ट करून विरंगुळा करणारे तसेच रिकामटेकडे हे त्यानिमित्य दुकानावर येत असत. तळीरामांच्या करमणुकीचे हे एकमेव साधन बंद झाल्याने येणारे जाणारे घरीच राहताना दिसून येत आहेत. यापूर्वी रात्री उशिरा रस्यांवरून वाहनांची राहणारी वर्दळही बंद झाली आहे.

Web Title: Peaceful atmosphere in the village due to drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.