एक कोटी ५२ लाखांचे पीककर्ज थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:26 AM2021-05-16T04:26:43+5:302021-05-16T04:26:43+5:30
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी सेवा सहकारी सोसायटीतर्फे यावर्षी कोरोना संकटात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये, या दृष्टीने थेट ...
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी सेवा सहकारी सोसायटीतर्फे यावर्षी कोरोना संकटात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये, या दृष्टीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पीककर्जाची रक्कम जमा केली आहे. गोवरी सेवा सहकारी संस्थेमधील सात-बारा प्राप्त झालेल्या २४८ शेतकरी सदस्यांना एक कोटी ५२ लाख ७८ हजारांचे पीककर्ज वितरण करण्यात आले.
संकटकाळात गोवरी सेवा सहकारी संस्थेने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. लाभार्थींच्या बचत खात्यात पीककर्जाची थेट रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र जुनघरी यांनी दिली.
कोरोनाचे सावट असल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागतात. अनेकदा कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भटकंती करावी लागते. सध्या संचारबंदी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, या दृष्टीने गोवरी सेवा सहकारी संस्थेने हा निर्णय घेतला. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना थेट मदत मिळण्याच्या दृष्टीने यावर्षी २४८ लाभार्थींच्या खात्यामध्ये थेट पीककर्जाची रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना या रकमेची उचल केव्हाही करता येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील एखाद्या ग्रामीण भागातील सेवा सहकारी संस्थेने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उचललेले हे सर्वांत मोठे पाऊल आहे. शेती हंगामाला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बी-बियाणे, खते यासाठी आर्थिक जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते. त्यामुळे गोवरी सेवा सहकारी संस्थेने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी लाभार्थींच्या बचत खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धनादेश उचल करून बँकेत जमा करण्याची प्रक्रिया करण्याची गरज राहिली नाही किंवा बँकेत होणारी गर्दी ही त्यांना टाळता आली.
कोट
पीककर्जाची एक कोटी ५२ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. कोरोनाकाळात शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
-हरिश्चंद्र जुनघरी अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था, गोवरी