पहाडावरील मजुरांचा उघड्यावर संसार
By Admin | Published: November 22, 2014 10:58 PM2014-11-22T22:58:33+5:302014-11-22T22:58:33+5:30
पोटाच्या भ्रांतीसाठी सगेसोयरे व मुलाबाळांची शाळा विसरुन पहाडावरील मजूर आपले बिऱ्हाड घेऊन कोणी कापूस वेचणीला तर कोणी ऊस कापणीला जात आहेत. काम मिळेल तिथे उघड्यावर संसार थाटून
जिवती : पोटाच्या भ्रांतीसाठी सगेसोयरे व मुलाबाळांची शाळा विसरुन पहाडावरील मजूर आपले बिऱ्हाड घेऊन कोणी कापूस वेचणीला तर कोणी ऊस कापणीला जात आहेत. काम मिळेल तिथे उघड्यावर संसार थाटून आपल्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाह करीत आहे. परिसरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याने गरीब व कोरडवाहू शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांनीे राहायचे कुठे? पोट भरायचे कसे? जगायचे कसे? संसार सांभाळायचा कसा, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत.
ग्रामीण भागातून कामाच्या शोधात बाहेर निघालेले मजूर काम मिळेल तिथे झोपड्या तयार करुन आपले वास्तव्य करतात. आपली आर्थिक बाजू बळकट व्हावी. यासाठी दिवसरात्र काम करून संसाराचा गाडा चालवितात. संसाराचा गाडा चालविताना मुलाबाळांचा साभाळं कोण करणार. त्यांना कोण शिकविणार म्हणून शाळेत शिकत असलेली बालकेही सोबतीला घेऊन जात असल्याने मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे. ना घर ना रस्ता, ना शिक्षण, ना वीज, ना आरोग्याच्या सोयी त्यांना मिळतात. हे सर्व विसरुन एखाद्या ठेकेदाराच्या आश्रयाखाली झोपड्या तयार करुन संसार करण्याची पाळी माणिगकड पहाडावरील मजुरांवर आली आहे.
दरवर्षी होणारा निसर्गाचा कोप, दुष्काळामुळे होणारे स्थलांतर आणि स्थलांतरामुळे त्यांच्या मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान यावर संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पहाडावर दलित आदिवासी, बंजारा समाज अधिक आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यांनाच मजूर म्हणून राबण्याची पाळी आली आहे. एकीकडे शासनाकडून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम व योजना राबवून विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे, तर दुसरीकडे पोटाची खडगी भरण्यासाठी पालक आपल्या मुलाला सोबत घेऊन स्थलांतरित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
मराठवाड्यातील लातूर, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक, नांदेड आदी जिल्ह्यात मजुरांना ऊस तोडणीचे काम नियमित मिळत असून रोजीसुद्धा समाधानकारक मिळते. पेरणीपूर्व ठेकेदाराकडून पैसे घेणे आणि दिवाळीनंतर कामाला जाणे, हा त्यांचा हंगाम ठरलेला आहे. दिवसरात्र शेतात राबराब राबूनही हाती काहीच पडत नसल्याने कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे.