५० फेरीवाल्यांवर मनपाची दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:17 PM2017-10-30T23:17:12+5:302017-10-30T23:17:36+5:30
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एक महिन्यापूर्वी सूचना देऊनही फुटपाथ व रस्त्याच्या कडेला दुकाने लावणाºया ५० फेरीवाल्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एक महिन्यापूर्वी सूचना देऊनही फुटपाथ व रस्त्याच्या कडेला दुकाने लावणाºया ५० फेरीवाल्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २८ हजार ३४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून अनाधिकृत बॅनर जप्तीची कारवाई मनपाने सुरू केली आहे.
महानगरपालिकेने शहरातील अनेक क्षेत्रात फेरीवाल्यांना बंदी घातली आहे. मात्र अनेक फेरीवाले बंदी असलेल्या क्षेत्रातही रस्त्याचे कडेला दुकाने लावून व्यवसाय करतात. यामुळे शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण विभागाने अनेकदा फेरीवाल्यांना नोटीस बजावून दुकाने हटविण्याचे सूचित केले होते. परंतु फेरीवाल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनपाने कारवाईचा बडगा उभारला आहे.
गेल्या एक महिन्यात ५० फेरीवाल्यांवर कारवाई करून २८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच विनापरवानगी शहरात लागलेले बॅनर हटविले जात आहे. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे बंडू चहारे, अनिल निकोडे, गणपत चहारे, विक्रम महातव, अनिल खोटे, मनीष शुक्ला आदी कर्मचारी करीत आहे.
फुटपाथ रिकामे करण्याचे आदेश
वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने व्यवसायिकांनी रस्त्याच्या कडेला दुकाने लावू नये अन्यथा अतिक्रमण विभागाकडून कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे व्यवसायिकांनी ५०० रुपयांचा दंड टाळण्यासाठी फुटपाथवर दुकाने लावू नये, असे आवाहन अतिक्रमण विभागप्रमुख सुभाष ठोंबरे यांनी केले आहे.