तत्कालीन लिज प्रमुखावर माहिती आयोगाकडून दंड
By admin | Published: July 18, 2016 01:54 AM2016-07-18T01:54:10+5:302016-07-18T01:54:10+5:30
नगर पालिका वरोराच्या लिज विभागातून माहितीच्या अधिकारात माहिती मागण्यात आली होती.
वरोरा नगर पालिका : वेतनातून वसुल होणार रक्कम
वरोरा : नगर पालिका वरोराच्या लिज विभागातून माहितीच्या अधिकारात माहिती मागण्यात आली होती. मात्र ही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे वरोरा नगरपालिकेच्या तत्कालीन लिज विभाग प्रमुखास माहिती आयोगाने दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. सदर दंडांची रक्कम तत्कालीन लिज विभाग प्रमुखाच्या वेतनातून वसुल करण्याचे आदेश माहिती आयोगाने नुकतेच दिले आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकारात वेळेत माहिती देत नसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वरोरा शहरातील रहिवासी अॅड. रोशन नकवे यांनी वरोरा पालिकेच्या लिज विभागात माहिती अधिकारात २४ सप्टेंबर २०१३ रोजी एका अर्जाद्वारे माहिती मागितली होती. परंतु संबंधीत विभागाने अपूर्ण माहिती दिल्याने मुख्याधिकारी यांच्याकडे अपिल केली. त्यावर सुनावणी झाली. परंतु कोणताही आदेश व माहिती अॅड. रोशन नकवे यांना देण्यात आला नाही.
त्यामुळे त्यांनी राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केली. या तक्रारीवर सुनावणी झाल्यानंतर अपिलार्थीने नव्याने सुनावणी घेवून माहिती विनामुल्य उपलब्ध करण्याचे आदेश आयोगाने दिले. माहिती आयुक्तांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजाविली. या नोटीसचा खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी केला. खुलासा समाधानकारक नव्हता.
तेव्हा नगर पालिका तत्कालीन माहिती अधिकारी तथा करनिरीक्षक सुभाष बोस हजर होते. मुख्याधिकारी गैरहजर होते. सुभाष बोस यांनी विहीत मुदतीत कोणताही प्रतिसाद दिला नाही, असे आयोगाने निष्कर्ष काढत सुभाष बोस यांच्यावर कलम २०७ च्या तरतुदीनुसार दोन हजार रुपये दंड ठोठवण्यात आला असून दंडाची रक्कम सुभाष बोस यांच्या वेतनातून सोयीनुसार हप्ते पाडून मुख्याधिकाऱ्यांना वसुल करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. मागील तीन वर्षापासून अॅड. रोशन नकवे यांनी संघर्ष करून आपला लढा जिंकला असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)