पैनगंगा खाणीच्या अधिकाऱ्याला घेराव
By Admin | Published: October 2, 2016 12:50 AM2016-10-02T00:50:03+5:302016-10-02T00:50:03+5:30
वेकोलि पैनगंगा कोळसा खाणीच्या कामगारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
इंटकचे आंदोलन : विविध मागण्या
घुग्घुस : वेकोलि पैनगंगा कोळसा खाणीच्या कामगारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. रूग्णवाहिकाच कामगारांची वाहतूक करीत असल्याने रूग्णांना वेळेवर रूग्णवाहिका मिळत नाही. तसेच इतर समस्यांच्या पूर्ततेकरिता शनिवारी कार्मिक व्यवस्थापक राबीन चटर्जी यांना घुग्घुस येथील पैनगंगा कार्यालयात इंटक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास घेराव घालून धारेवर धरले.
येथून ४० कि.मी अंतरावरील वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीमध्ये १८० कामगार कार्यरत असून बहुसंख्य कामगारांसाठी वेकोलिकडून वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनाची पुरेशी व्यवस्था नसल्याने रूग्ण वाहिकेचा वापर केल्या जात असल्याने कामगाराचा अपघात झाला असता वेळेवर रूग्णवाहिका मिळत नाही.
खाण परिसरात व येथील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. खाणीत सात ते आठ पाण्याच्या कॅनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे कामगारांना पुरेसे पाणी मिळत नाही. व्यवस्थापनाच्या बेजबाबदार धोरणामुळे पावसाचे पाणी कोळसा खाणीत घुसले. त्यातून कोळसा उत्पादन ठप्प झाले आहे. क्षेत्रीय उपमुख्य कार्मिक प्रबंधक डी. मनोग्ररन यांनी तातडीने पुरेशा पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला.
वेकोली वणी क्षेत्राचे इंटक अध्यक्ष लक्ष्मण सादलावार, जी. विजय कुमार , महासचिव राजपाल वर्मा, रामस्वामी सोदारी, एन. ठाकरे, जाहीरभाई, सुनील जानवे, डी.बी.कापसे, श्रीकांत माहुलकर, अजय पाटील, राजेश निषाद, तिरुपती महाकाली, एम. के. खान, इत्याजभाई, शौकत अली बरोबरच कार्यकर्ते व कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)