ब्रह्मपुरी तालुक्यातील जनतेला औद्योगीकरणााची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:38+5:302021-09-07T04:33:38+5:30
दत्तात्रय दलाल ब्रह्मपुरी : तालुक्याचा विस्तार फार मोठा आहे. येथील लोकसंख्या १.५० लाखाच्या जवळपास आहे. मात्र, तालुक्यात कोणताही मोठा ...
दत्तात्रय दलाल
ब्रह्मपुरी : तालुक्याचा विस्तार फार मोठा आहे. येथील लोकसंख्या १.५० लाखाच्या जवळपास आहे. मात्र, तालुक्यात कोणताही मोठा औद्योगिक प्रकल्प नसल्याने परराज्यात जाऊन येथील नागरिकांना रोजगार शोधावा लागतो. वनसंपत्ती व खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. यावर आधारित प्रकल्प उभारल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना औद्योगीकरणाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले ब्रह्मपुरी शहर वैनगंगा नदीने वेढले आहे. तालुक्याचा विस्तार उत्तर-दक्षिण पसरला असून ७५ ग्रामपंचायती तर १२० गावे तालुक्यात आहेत. मात्र, कोणतेच मोठे उद्योग नसल्याने नागरिकांना मुंबई, पुणे किंवा परराज्यात रोजगाराकरिता जावे लागते. त्यामुळे बराच कालावधी परिवरापासून दूर राहावे लागते. कोरोनासारख्या संकटात अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना काळात स्वगावी येण्यासाठी त्रास सहन करावा लागला होता.
बॉक्स
वनसंपदाही मुबलक
ब्रह्मपुरी वनविभाग ३० हजार हेक्टर विस्तीर्ण आहे. जंगलात विविध वनस्पती असून मोह, साग, बाभूळ, बांबू यासारखी उपयुक्त झाडे आहेत. येथील जमिनीत अभ्रक, जस्त, पोलाद यासारखी खनिज संपत्ती आढळते. यावर आधारित मोठे उद्योग उभारल्यास नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना तालुक्यात औद्योगीकरणाची प्रतीक्षा आहे. स्थानिक आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जातीने लक्ष घालून तालुक्यात विविध उद्योग निर्माण करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
कोट
एमआयडीसीकरिता जागा उपलब्ध करुन खऱ्या बेरोजगारांना ती जागा पर्याप्त स्वरूपात मिळावयास हवी. जंगलावर आधारित उद्योग सुरू करता येतील. तालुक्यात राईस मिल मोठ्या प्रमाणात आहेत. धानाचा कोंडा व कुक्कुसापासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतील. ग्रामीण भागात गवत व तणस मोठ्या प्रमाणात आहे. घर तिथे गाय ही योजना राबवून डेअरी निर्मिती करता येईल. त्याकरिता विविध बॅंक व पतसंस्थामार्फत मदत घेता येईल.
- प्रा. अतुल देशकर,
माजी आमदार, ब्रह्मपुरी, विधानसभा
060921\img_20210829_174014.jpg
एकारा रस्त्यातील जंगलातून जाणारा रस्ता