वाघिणीच्या डरकाळीने पळसगाववासीयांची झोप उडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:19 AM2021-07-04T04:19:39+5:302021-07-04T04:19:39+5:30
पळसगाव (पिपर्डा ) : ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव परिसरात वाघिणीने ठाण मांडले आहे. तिचे बछडे तिच्यापासून दुरावल्याने ...
पळसगाव (पिपर्डा ) : ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव परिसरात वाघिणीने ठाण मांडले आहे. तिचे बछडे तिच्यापासून दुरावल्याने वाघीण तिथेच राहिली. आता वाघिणीला तिचे तीनही बछडे मिळाले आहेत. तरीही वाघीण व तिचे बछडे गाव परिसरातच आहेत. वाघिणीच्या डरकाळीने पळसगावातील ग्रामस्थांची झोप उडाली आहे.
या वाघिणीने आतापर्यंत एका गोऱ्ह्याला ठार केले तर वनकर्मचाऱ्यासह एका व्यक्तीला जखमी केले आहे. वाघिणीने संपूर्ण पळसगाव, गोंडमोहाळी परिसरात आपली दहशत निर्माण केली. ती वाघीण अखेर आपल्या बछड्यांना शुक्रवारी भेटली. मात्र बछडे मिळूनही तिने हा परिसर सोडलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तिच्यापासून धोका निर्माण झाला आहे. वनविभाग या वाघांना सुरक्षा देत असून गावकरी व शेतकरी यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र या परिसरात पाहावयास मिळत आहे.
रात्री वाघिणीची डरकाळी गावकऱ्यांना झोपू देत नाही. शेती करू देत नाही. ऐन हंगामात विचित्र परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. वनविभाग तर याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आता लोकप्रतिनिधींनीच या वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला जागृत करावे, अशी मागणी आहे.
बॉक्स
शेतावर जाणे बंद
वाघीण व तिच्या बछड्यांच्या दहशतीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतावर जाणेही काही दिवसांपासून बंद केले. आता तर वाघीण व बछडे एकत्र फिरत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बॉक्स
शेळीवर हल्ला
वाघीण आणि तिचे बछडे मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पहिली शिकार केली. शनिवारी कक्ष क्र. १००१ मध्ये चरणाऱ्या शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. श्रीहरी वघारे यांच्या मालकीची ही शेळी होती.
030721\img-20210703-wa0206.jpg
वाघिणीचा पुन्हा एकदा कहर गावशेजारीच शेळीला केले ठार