सुधीर मुनगंटीवार शब्द पाळणारे लोकनेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:53 AM2018-01-06T00:53:43+5:302018-01-06T00:53:58+5:30
विकासासंबंधी आजवर जो शब्द ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला तो प्राधान्याने पूर्ण केला आहे. म्हणूनच शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची राज्यभर ख्याती आहे. बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा निर्णय त्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विकासासंबंधी आजवर जो शब्द ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला तो प्राधान्याने पूर्ण केला आहे. म्हणूनच शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची राज्यभर ख्याती आहे. बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा निर्णय त्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दृष्टीने नेहमीच त्यांनी पुढाकार घेतला असुन रूग्णसेवा हीच ईश्वराची सेवा आहे, असे समजून कार्य करणाºया ना. मुनगंटीवार यांचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमीपूजन कार्यक्रमात चंदनसिंह चंदेल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंद पोडे तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, सरचिटणीस रमेश पिपरे, बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती राजू बुध्दलवार, जिल्हा परिषद सदस्या वैशाली बुध्दलवार, हरीश गेडाम, पंचायत समिती च्या उपसभापती इंदिरा पिपरे, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पदमगिरीवार, विद्या गेडाम, इटोलीच्या सरपंच मंगला सातपुते आदी उपस्थित होते.
चंदेल पुढे म्हणाले, ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याबाबत नागरिकांना शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पूर्ण केला आहे. त्यांनी आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सुमारे ५०० हून अधिक दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचे वितरण, ३५ हजार नागरिकांना चश्मे वितरण, पाच हजार नेत्ररूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासह नुकतीच लाईफ लाईन एक्सप्रेस या उपक्रमाच्या माध्यमातून रोगनिदान, उपचार व नि:शुल्क शस्त्रक्रिया त्यांनी करविल्या. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय नुकत्याच त्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. हे कॅन्सर रूग्णालय वर्षभरात उभारण्यात येणार आहे. नेहमी तत्पर राहून नागरिकांना दिलासा देणारा हा नेता खऱ्या अर्थाने लोकनेता आहे, असे ते म्हणाले, यावेळी वैशाली बुध्दलवार, हरीश गेडाम, गोविंद पोडे आदींची भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन रमेश पिपरे यांनी केले.