जनतेचे मिशन जनतेने पूर्ण केले
By admin | Published: July 8, 2016 12:46 AM2016-07-08T00:46:03+5:302016-07-08T00:46:03+5:30
एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड हे जनतेचे मिशन होते, ते जनतेने पूर्ण केले. ही खरोखरच अभिमानाची आणि अभिनंदनाची बाब आहे,
सुधीर मुनगंटीवार : महाराष्ट्राचे वृक्षचळवळीत लक्षणीय पाऊल
चंद्रपूर : एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड हे जनतेचे मिशन होते, ते जनतेने पूर्ण केले. ही खरोखरच अभिमानाची आणि अभिनंदनाची बाब आहे, असे प्रसंशोदगार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. राज्यात झालेल्या दोन कोटी वृक्षलागवडीसंदर्भात पत्रकारांशी ते बोलत होते.
संपूर्ण राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी झालेल्या या मोहिमेवर ना. मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हे जनतेचे मिशन होते. ते यशस्वी करताना पक्षभेद विसरून सर्वजण पुढे आले, हे महत्वाचे आहे. नागरिकांनी उत्सफुर्तपणे वृक्षारोपण केले. स्वत:च्या पैशाने रोपे विकत घेवून लावली. अनेक संस्था या कामी स्वत:हून पुढे आल्या आणि त्यांनी वृक्षारोपणातील आपले उद्दीष्ट पूर्ण केले. जनतेचा हा सहभागच लावलेली रोपे जगविण्यासाठी महत्वाचा ठरेल. लावलेली रोपे अधिक प्रमाणावर जगविणे हे यापुढील कर्तव्य आहे. जसे वनविभागाचे तसे प्रत्येक नागरिकाचेही ते कर्तव्य ठरणार आहे.
या दोन कोटी वृक्षारोपणाच्या कार्यात अनेक संस्था, संघटना पुढे आल्याचे सांगून ते म्हणाले, प्रकाश जावडेकर यांनी वनविभागाच्या विविध योजना आणि वृक्षारोपणासाठी दोन हजार कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहे. नरेगामध्येही निधी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातूनही या कामी निधी घेण्याची तयारी सुरू आहे. एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लावून महाराष्ट्राने नवा इतिहास मांडला आहे. या कामाची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये घेतली जात आहे. राज्यात पुढील काळात ५० कोटी वृक्ष लावण्याची सरकारची योजना आहे. त्या दृष्टीने सर्व माहिती संकलित करून युनोकडे पाठविण्याच्या तयारीत सरकार आहे. एक वेबसाईड तयार करून त्यावर सर्व माहिती संकलित केली जात आहे. त्यांच्याकडून या कामी मदत मिळविण्याच्या दृष्टीने विचार सुरु असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
वनमंत्र्यांचे मन हरविले गर्द आमराईत
४० रूपये किलोच्या दराने देशी आंब्याच्या कोई खरेदी करण्याचा उपक्रम यंदा चंद्रपूरच्या वनविभागाने राबविला होता. यातून ४०० किलो देशी आंब्याच्या कोई सहज जमा झाल्यात. हे सांगताना वनमंत्री मुनगंटीवारांचे मन गर्द हिरव्या आमराईत हरविले. ते म्हणाले, अत्यल्प दरात कोई विकत घेवूनही या योजनेला यश मिळाले. या यशाचा अंदाज आधीच आला असता तर, ही योजना राज्यात राबविली असती. आपण प्रवासात असतो तेव्हा शेतशिवारावरील गर्द हिरवी आमराई दिसली की मन प्रसन्न होते. एखाद्या गावात अशी आमराई दिसली की मन हरखून जाते.