पोलीस स्थापना दिनानिमित्त जनसमस्या निराकरण मेळावे होणार
By admin | Published: January 3, 2015 11:00 PM2015-01-03T23:00:07+5:302015-01-03T23:00:07+5:30
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा करण्यात आला. या दिवशी दिवंगत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस
चंद्रपूर : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा करण्यात आला.
या दिवशी दिवंगत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस दलास ध्वज प्रदान करण्यात आली होता. त्या पार्श्वभूमीवर जनता व पोलीस यांच्यात समन्वय प्रस्थापित व्हावा यासाठी २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत सर्व सामान्य जनतेच्या सहकार्याने जनतेच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी विविध प्रकारचे मेळावे आयोजित करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींची पोलीस ठाण्याला भेट आयोजित करून प्रभारी अधिकारी त्यांना पोलिसांच्या कामकाजाविषयी सर्व माहिती देण्यात येणार आहे. तसेच शाळांमधील मुलींसाठी स्वसंरक्षणाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यातील उपलब्ध हत्यार, दारूगोळा दाखवून त्यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी पोलीस बॅण्ड पथकाचे संचालन करण्यात येणार आहे. तसेच एक विशेष मोहीम राबवून पोलीस तपासावरील तसेच न्यायालयात न्यायदानासाठी प्रलंबित प्रकरणातील फिर्यादी यांना समक्ष भेटून त्यांना त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन केलेल्या कार्यवाही संबंधात माहिती देणारा आहे.
शाळा-महाविद्यालयात त्याचप्रमाणे हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन किंवा सदर ठिकाणी कार्यक्रम आयोजन करून वाहतूक नियम, सुरक्षा, आतंकवाद हल्ले याबाबत चर्चासत्र, मेळाव्यांचे आयोजन करून माहिती देण्यात येणार आहे. विशेष मोहिमेद्वारे प्रकरणातील किंमती मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा आहे, अशा प्रकरणातील फिर्यादींना बोलावून त्यांना सदर मुद्देमाल परत घेण्याविषयी कायदेविषयक अडचणी पूर्ण करून मुद्देमाल घेऊन जाण्याबाबत मदत करण्यात येणार आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चंद्रपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षात वाहतुकीबाबत माहिती देणार आहे.
पोलीस स्थापना दिनानिमित्त घुग्घुस, ब्रह्मपुरी, कोठारी, चिमूर, चंद्रपूर शहर, गडचांदूर, राजुरा येथील पोलीस ठाण्यात कार्यक्रम राबविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)