बेरोजगार मजुरांना मिरची सातऱ्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:19 AM2018-03-15T01:19:01+5:302018-03-15T01:19:01+5:30
गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षी अनेक मजुरांवर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे काही जण गाव सोडून रोजगाराच्या शोधात शहराकडे वळत आहेत, तर काही जण गावातच मिळेल ते काम करण्यासाठी धावपळ करीत आहेत.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षी अनेक मजुरांवर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे काही जण गाव सोडून रोजगाराच्या शोधात शहराकडे वळत आहेत, तर काही जण गावातच मिळेल ते काम करण्यासाठी धावपळ करीत आहेत. मात्र नागभीड तालुक्यातील शेकडो मजुरांना मिरची सातऱ्यांचा रोजगारासाठी आधार मिळाला आहे.
नागभीड तालुक्यात मिरची कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणावर मिरची सातरे थाटण्यात आले असून या सातºयावर शेकडो मजूर काम करीत आहेत. तालुक्यात किमान १० ते १५ गावात मिरची सातरे असून एका सातºयावर १५० ते २०० मजूर असे जवळपास तीन हजार मजुरांना काम मिळाला आहे. नागभीड तालुका उद्योग विरहित आहे. या तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धान पिकावर अवलंबून असते. असे असले तरी गेल्या काही वर्षात निसर्गाच्या अवकृपेने तालुक्याची अर्थव्यवस्था पार डबघाईस आली आहे. परिणामी येथील मजूर वर्गास कामाच्या शोधात दुसºया जिल्ह्यात स्थलांतर करावे लागत आहे. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून आंध्र प्रदेशातील मिरची कंत्राटदारांनी नागभीड तालुक्यात मिरची साफ करण्यासाठी सातरे सुरू केले. अगोदर त्यांनी हा प्रयोग मोहाळी-बाम्हणी येथे केला. या सातºयांना मिळालेला मजुरांचा प्रतिसाद लक्षात घेता, ज्या ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत आहेत, त्या त्या ठिकाणी मिरची सातरे सुरू करण्यात आले आहेत .
सद्यास्थितीत कानपा, मोहाळी, बाम्हणी, नवखळा, नवेगाव, मौशी, ओवाळा, वाढोणा, पळसगाव, चिचाळा या ठिकाणी मिरची सातरे सुरु आहेत. यातील काही ठिकाणी मजुरांची उपलब्धता लक्षात घेवून दोन दोन सातरे सुरू करण्यात आले आहेत. ही मिरची जवळच असलेल्या भिवापूर येथील असावी, असा लोकांचा समज आहे. मात्र हा समज चुकीचा असून ही मिरची आंध्र प्रदेशातील ठेकेदारांकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मिरचीच्या कांड्या काढून ती साफ झाल्यानंतर ही मिरची विदेशात निर्यात करण्यात येते, अशी माहिती आहे. मिरची साफ करण्यासाठी मजुरांना प्रती बोरीमागे विशिष्ट रक्कम दिली जाते. शारिरिकदृष्या हे काम घातक असले तरी हे काम केल्याशिवाय मजुरांसमोर अन्य पर्याय नसल्याने शेकडो मजूर येथे काम करीत आहेत.