पेरा अत्यल्प; उत्पादन पन्नास हजार क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:31+5:302021-07-14T04:33:31+5:30
निलेश झाडे गोंडपिपरी : तालुक्यात ठोकळ धानाचा पेरा अत्यल्प आहे. असे असताना तब्बल पन्नास हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात ...
निलेश झाडे
गोंडपिपरी : तालुक्यात ठोकळ धानाचा पेरा अत्यल्प आहे. असे असताना तब्बल पन्नास हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. ठोकळ धानावर शासनाने बोनस जाहीर केले. हे बोनस मिळविण्यासाठी मोठा गोरखधंदा तालुक्यात सुरू असल्याची चर्चा आहे.
गोंडपिपरी तालुक्यात अंदाजे ११ हजार हेक्टरवर धानाचा पेरा केला जातो. बारीक तांदुळ खायला रूचकर असतो व बाजारात चांगला भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकरी बारीक धान पेरतात. धान पीक चांगले जमून आले तर साधारणत: एका एकरात २० क्विंटल धानाचे उत्पादन होते. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि वन्यजीवांच्या त्रासामुळे सरासरी एका एकरात १० ते ११ क्विंटल उत्पादन सद्यस्थितीत घेतले जात आहे.
गोंडपिपरी तालुक्यात कृषी विभागाची धाबा, गोंडपिपरी अशी दोन मंडळे आहेत. धाबा मंडळात अंदाजे ५ हजार २०० हेक्टर क्षेत्रात धानाचा पेरा आहे. गोंडपिपरी मंडळात अंदाजे ५ हजार ६०० हेक्टरचा पेरा आहे. या दोन्ही मंडळातील क्षेत्रात केवळ तीनशे ते चारशे हेक्टरमध्ये ठोकळ धानाचा पेरा सन २०२० मध्ये होता, अशी माहिती आहे. ठोकळ धानाचा पेरा वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रचार आणि प्रसार केला. कृषी विभागाच्या आव्हानाला शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिला व ठोकळ धानाच्या ऐवजी बारीक धानाचा पेरा केला. तालुक्यातील कृषी केंद्रातून बारीक धानाच्या वाणाची सर्वाधिक विक्री झाली आहे. ठोकळ धानाचे क्षेत्र अत्यल्प असतानाही तालुक्यातून तब्बल ५० हजार क्विंटल ठोकळ धानाची खरेदी झाली आहे.
बोनससाठी काहीपण...!
ठोकळ धानाची खरेदी हमीभावानुसार झाली. कोरपणा तालुका खरेदी-विक्री संस्थेने धान खरेदी केले. तालुक्यातून संस्थेने ४५ हजार ७७ क्विंटल धानाची उचल केली. प्रती क्विंटल १८६८ रुपये धानाचा भाव होता. सोबत प्रती क्विंटलवर सातशे रुपये बोनस मिळणार होते. बोनस मिळविण्यासाठी तालुक्यातील काहींनी लगतच्या तेलंगणातून धान आणल्याची चर्चा आहे. ते धान जवळचा व्यक्तीच्या सातबाऱ्यावर विकले गेले अशी चर्चा आता रंगली आहे.
तारण योजनेत केवळ ६ हजार ५०० क्विंटल बारीक धान
ठोकळ धानाचा उत्पनाचा आकडा वाढलेला असतांना बारीक धानाचे उत्पन्न घसरले, असे किमान कागदपत्रानुसार वाटते. गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत तारण योजनेखाली केवळ ६ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल धान असल्याची माहिती कृऊबाचे सचिव अनिल चौधरी यांनी दिले.
शेतकऱ्यांना भीती
गोंडपिपरी तालुक्यातील शेती बेभरोशाची आहे. दरवर्षी निसर्ग आणि वन्यजीवांमुळे अत्यल्प पीक बळीराजाच्या हाती पडते. मात्र, केवळ बोनससाठी जो गोरख धंदा केला गेला त्यामुळे तालुक्यातील आणेवारीत वाढ झाली. अशा प्रकारामुळे भविष्यात शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत थांबू शकते, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.