ताडोबातील ५०० बेरोजगारांना मिळणार कायमस्वरुपी रोजगार

By admin | Published: April 5, 2017 12:40 AM2017-04-05T00:40:05+5:302017-04-05T00:40:05+5:30

निसर्गाने ताडोबाच्या रुपाने आमच्याजवळ मोठी नैसर्गिक संपत्ती दिली आहे. ताडोबा केवळ महाराष्ट्रापर्यंतच नाव न राहता आंतरराष्ट्रीय आकर्षणाचे केंद्र होत आहे.

Permanent employment for 500 unemployed people in Tadoba | ताडोबातील ५०० बेरोजगारांना मिळणार कायमस्वरुपी रोजगार

ताडोबातील ५०० बेरोजगारांना मिळणार कायमस्वरुपी रोजगार

Next

विविध प्रकल्पाचे मुनगंटीवारांच्या हस्ते लोकार्पण : ताडोबा आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र होणार
चंद्रपूर : निसर्गाने ताडोबाच्या रुपाने आमच्याजवळ मोठी नैसर्गिक संपत्ती दिली आहे. ताडोबा केवळ महाराष्ट्रापर्यंतच नाव न राहता आंतरराष्ट्रीय आकर्षणाचे केंद्र होत आहे. त्यामुळे या परिसरातील पुढच्या पिढीला जंगलाचे रक्षण व वाघाचे संरक्षण याचे प्रशिक्षण व आग्रह करण्याची गरजच भासू नये. त्यासाठी आगझरी येथे ताडोबा परिसरातील मुलांसाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या कॅम्पिंग साईटमधून उद्याच्या ताडोबाचे प्रचारप्रसार करणारे व्याघ्रदूत निर्माण होतील, अशी आशा राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी ५०० लोकांना रोजगार मिळेल अशा विविध चार प्रकल्पाचे लोकार्पण केले.
ताडोबा आगरझरी गावामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे सोमवारी कॅम्पिग साईट आगरझरी, देवाडा, जुनोना, अडेगांव येथील अगरबत्ती निर्मिती केंद्र आणि अडेगांव येथील बांबू वस्तू निर्मिती केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पातून जवळपास ५०० युवक-युवतींना कायमस्वरुपी रोजगार मिळणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जी.पी. गरड, उपसंचालक जी. पी. नरवणे, उपसंचालक डॉ. के.एस.मानकर, परिविक्षाधिन सहायक वनसंरक्षक राहुल पाटील यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
एकाच व्यासपीठावरून त्यांनी विविध पाच प्रकल्पाचे लोकार्पण केले. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमधून महिला बचत गटांना बळकट करण्यात येणार असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याशिवाय या भागामध्ये पर्यटन वृध्दीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. बांबू वस्तु निर्मिती करताना स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन विविध साहित्य निर्मिती केंद्र सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पातून सध्या युवकांना कायम स्वरुपी रोजगार मिळत आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारला या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कॅम्पिंग साईटला भेट दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाशेजारी असणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवसांच्या निवासी प्रशिक्षणामार्फत आपल्या वनसंपदेची माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध गटांना माहिती देण्यासाठी डिजिटल कार्यशाळा उभारण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी स्वत: डिजिटल बोर्डाचा वापर करत स्वहस्ताक्षरात शुभेच्छा दिल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षण केंद्रातून हरित सेनेच्या सदस्य वाढीसाठी मदत होईल, असे प्रतिपादन केले.
यावेळी उपस्थितांना संबोधतांना ना मुनगंटीवार म्हणाले, वनमंत्री म्हणून आपण शंभर धाडसी निर्णय घेतले असून याचा फायदा मोठया प्रमाणात जंगलाशेजारी गावाकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांसाठी कुंपण योजना, जनावरांच्या हल्ल्यातील ठार झालेल्या गुरांसाठी वाढीव मोबदला, वन अकादमी, बांबू प्रशिक्षण केंद्र या सगळया निर्णयांच्या माध्यमातून जंगलाशेजारी नागरिकांचे जंगल संपदेवरचे अंवलंबित्व कमी व्हावे, हा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आता यापुढे महिलांना इंधनासाठी जंगलात जाऊन लाकूडफाटा आणायची गरज भासणार नाही.या दिवाळीपर्यंत परिसरातील सगळया महिलांना मोफत गॅस मिळेल यासाठी अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालावे, असे त्यांनी आवाहन केले.
गरिबांना साहनुभूती दाखविणे, मदत करणे यापेक्षा त्यांना आत्मनिर्भर करणे सर्वात महत्वाचे असून त्यासाठी आपण झटत असून या परिसरातील पुढच्या पिढीला जंगलाचे महत्व सांगावे लागणार नाही. हा व्याघ्र प्रकल्पच आणि येथील वनसंपदा जनतेसाठी रोजगाराचे साधन होईल, अशी शाश्वतीही त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Permanent employment for 500 unemployed people in Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.