चंद्रपुरात सुरू होणार जैवविविधतेवर कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र; वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 02:56 PM2022-09-15T14:56:16+5:302022-09-15T14:59:13+5:30

राज्य शासनातील विविध विभागात काम करणारे अधिकारी, विद्यार्थी, शेतकरी, कृषीतज्ज्ञ यांच्यासह या विषयावर संशोधन करणाऱ्यांसाठी या केंद्राचा फायदा होईल, याकडेही मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.

Permanent Training Center on Biodiversity to be started at Chandrapur - Forest Minister Sudhir Mungantiwar | चंद्रपुरात सुरू होणार जैवविविधतेवर कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र; वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

चंद्रपुरात सुरू होणार जैवविविधतेवर कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र; वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

Next

चंद्रपूर : राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज असून, यासंदर्भात चंद्रपूर येथे जैवविविधता प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथिगृह येथे वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. जैवविविधतेचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक झाल्याने महाराष्ट्रातील सर्वांसाठी एक प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरू करण्यात येईल. या केंद्रात वर्षांतील ३६५ दिवस जैवविविधता जपण्यावर प्रशिक्षण देण्यात येईल. राज्य शासनातील विविध विभागात काम करणारे अधिकारी, विद्यार्थी, शेतकरी, कृषीतज्ज्ञ यांच्यासह या विषयावर संशोधन करणाऱ्यांसाठी या केंद्राचा फायदा होईल, याकडेही मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.

बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मत्स्यविकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नानोटिया, वन बल प्रमुखाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल.पी. राव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. क्षे. ही. पाटील, वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, जैवविविधता मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण श्रीवास्तव, पद्मश्री राहीबाई पोपेरे, बीएआयएफचे विश्वस्त गिरीश सोहनी, डॉ. राजश्री जोशी, ममता भांगरे, योगेश नवले यांच्यासह जैवविविधतेवर काम करणारे अभ्यासक उपस्थित होते.

जैवविविधता विषयावर क्यूआर कॉफी टेबल बुक

जैवविविधता म्हणजे नेमके काय, जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती आवश्यक आहे, तसेच या क्षेत्रात तज्ज्ञ लोकांनी केलेले काम लोकांसमोर आणण्यासाठी छोटेखानी क्युआर कॉफी टेबल बुक तयार करावे. जैवविविधता मंडळाने एक स्वतंत्र ॲप तयार करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना जोडण्याच्या सूचनाही मुनगंटीवार यांनी केल्या.

जैवविविधतेवर मराठीत साहित्य उपलब्ध करा

जैवविविधता मंडळामार्फत तयार करण्यात आलेले १ ते ३ खंड त्वरित मराठीत करण्यात यावेत, मातृभाषेत असल्यामुळे ते अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. पहिली ते दहावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकात पर्यावरण, जैवविविधता यावर धडा असेल याची खात्री करून घेण्यात यावी, अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.

Web Title: Permanent Training Center on Biodiversity to be started at Chandrapur - Forest Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.