व्यक्ती जातीने नव्हे, गुणांनी मोठा होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:41 AM2019-04-01T00:41:26+5:302019-04-01T00:42:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भद्रावती : चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा - शिवसेना - रिपाइं (आ) महायुतीचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा - शिवसेना - रिपाइं (आ) महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन रविवारी दुपारी २ वाजता स्थानिक यशवंतराव शिंदे महाविद्यालयाच्या पटांगणात करण्यात आले.
या सभेला महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर, आ. नाना शामकुळे, खा. विकास महात्मे, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी पालकमंत्री संजय देवतळे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, अशोक घोटेकर, भाजपा नेते डॉ. अनिल बुजोणे, चंद्रकांत गुंडावार, राहुल सराफ उपस्थित होते.
यावेळी भाजपा नेते नितीन गडकरी म्हणाले, देशाला आर्थिक विकासाची दिशा देणे जरूरी आहे. कोणताही व्यक्ती जातीने नव्हे तर गुणांनी मोठा होतो. ही निवडणूक गोरगरीब जनतेच्या उज्ज्वल भविष्याच्या विचार करणारी निवडणूक आहे. आतापर्यंत फक्त चंद्रपूर जिल्ह्यात सहा हजार कोटी रूपयांची रस्त्याची कामे मंजूर करण्यात आल्याचे सांगत त्यांनी विविध क्षेत्रात झालेल्या विकासात्मक कामांची माहिती दिली. विदर्भातील सिंचन, तणसापासून बायोसिएनजी, फ्रान्ससारखे मासोळ्यांचे उत्पादन, कोळसापासून मिथेनॉल तयार करणे याबाबतची माहिती त्यांनी दिली. कोळसापासून इंधन तयार झाले तर पेट्रोल - डिझेल आपल्याला आयात करण्याची गरज राहणार नाही. पण हे सगळे करण्यासाठी योग्य नेतृत्व व सरकारची गरज असल्याचे ते म्हणाले.
पत्रिका एकाची अन् लग्न भलत्याचेच
या मतदार संघात उमेदवाराचे नाव जाहीर करण्यास कॉंग्रेसला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. आधी एकाला उमेदवारी दिली. नंतर एबी फार्म दुसऱ्यालाच दिला. पत्रिका एकाची अन् लग्न भलत्याचेच, असा प्रकार काँग्रेसच्या तिकीट वाटपात झाला, असा टोमणाही यावेळी गडकरी यांनी लगावला.