कृषी केंद्रातून कीटकनाशके जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:45 PM2018-08-10T22:45:35+5:302018-08-10T22:47:01+5:30
अधिकृत विक्रेता नसतानाही डुपॉन्ट कंपनीचे कोराजीन कीटनाशक विक्री करणाऱ्या येथील सुरज अॅग्रो एंजसीमधून सदर कीटनाशकाचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षकांनी शुक्रवारी ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : अधिकृत विक्रेता नसतानाही डुपॉन्ट कंपनीचे कोराजीन कीटनाशक विक्री करणाऱ्या येथील सुरज अॅग्रो एंजसीमधून सदर कीटनाशकाचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षकांनी शुक्रवारी ही कारवाई केली.
वरोरा शहरातील सुरज अॅग्रो एजंसीकडे डुपॉन्ट कंपनीचे कोराजीन (कीटनाशक) कंपनीची अधिकृत डिलरशिप नसताना विक्री सुरू असल्याची तक्रार कंपनीकडे काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. सदर कंपनीचे दिल्ली येथील व्यवस्थापक भीमसेन व कंपनीचे वरिष्ठ तपास अधिकारी श्यामसिंग यांनी लगेच वरोरा शहर गाठले. दरम्यान हे कीटनाशक बनावट असल्याची शक्यताही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीद्वारे केली. तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक एम. जी. सोनटक्के यांनी शुक्रवारी कीटनाशकाची तपासणी केली. यावेळी कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते. हे कीटनाशक बनावट आहे की नाही हे प्रयोगशाळेत पाठविल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे एका बाटलीतील नमुने अमरावती येथील कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. प्रयोगशाळेतून निष्कर्ष येईपर्यंत विक्रीसाठी प्रतिबंध करण्यात आले आहे. याबाबत सुरज अॅग्रो एंजसीच्या संचालकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधले असता काहीच न झाले नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
कंपनीचे अधिकृत विक्रेते नसतांना वितरकाकडून त्यांनी खरेदी न केल्याने े कीटकनाशक बनावट करणाऱ्यांकडून आणले असावे, अशी शंका आम्हाला होती. विक्री करीत असल्याची माहिती कंपनीला मिळाली. त्यानुसार आम्ही प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यावरून जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक एम. जी . सोनटक्के यांनी ही कारवाई केली.
- भीमसेन, व्यवस्थापक
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बनावट कीटकनाशक विकत असल्याची तक्रार दिली होती. त्यावरून सदर कृषी केंद्राची तपासणी केली. उपलब्ध असलेले डुपॉन्ट कीटकनाशक आम्ही कंपनी अधिकाऱ्यांना दाखविले असता हे उत्पादन आमचेच असल्याची कबुली दिली. मात्र ते बनावट की खरे हे शोधण्याचे काम प्रयोगशाळेचे असल्याने आम्ही सदर नमुने अमरावती येथील कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळेत पाठविले. उर्वरित साठा सील करून विक्रीला प्रतिबंध घातला.
- एम. जी. सोनटक्के, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक