पीएच.डी. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची वणवण; मार्गदर्शकच मिळेनात

By साईनाथ कुचनकार | Published: December 7, 2023 02:43 PM2023-12-07T14:43:33+5:302023-12-07T14:44:28+5:30

पेट पास विद्यार्थ्यांची चिंता वाढली : परिपत्रक काढण्याची मागणी

Ph.D. Candidates who have cleared the entrance exam are referred for guidance | पीएच.डी. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची वणवण; मार्गदर्शकच मिळेनात

पीएच.डी. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची वणवण; मार्गदर्शकच मिळेनात

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत पीएच.डी. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शोधप्रबंधाकरिता सिनोप्सिस सादर करण्यासाठी मार्गदर्शक उपलब्ध होत नसल्याने त्यांची वणवण सुरू आहे. याकडे गोंडवाना विद्यापीठासह सिनेट सदस्यांनी लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत नुकतीच आचार्य पदवी प्रवेश परीक्षा (पेट) झाली. यामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांचा आचार्य पदवी करिता प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रक्रियेत सुरुवातीला त्यांना त्यांच्या विषयाचा मार्गदर्शक (गाइड) ठरवून त्यानंतर प्रत्यक्ष शोध कार्यास सुरुवात करण्यापूर्वी संशोधन केंद्रात शोध प्रबंधाची सिनोप्सिस सादर करावी लागते. त्यासाठी मार्गदर्शक असणे आवश्यक आहे. मात्र गोंडवाना विद्यापीठाच्या जाचक अटींमुळे विद्यापीठात विषयानुरूप पुरेसे मार्गदर्शक उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाचे मार्गदर्शक मिळत नसल्याने आचार्य पदवी प्रवेश प्रक्रियेपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. याचा परिणाम गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत आहे.

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत अनेक महाविद्यालयांत रिसर्च सेंटर नाही. ज्या महाविद्यालयात रिसर्च सेंटर नाही तेथील प्राध्यापकांना मार्गदर्शक होता येत नाही. परिणामी मार्गदर्शकांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे संबंधित विषयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांअभावी संशोधन प्रक्रियेत सहभागी होण्यास अडचण होत आहे. याबाबत नुकतीच सिनेट सदस्य डॉ. प्रवीण जोगी यांनी विद्यापीठाच्या अधिसभेत ज्या महाविद्यालयात संशोधन केंद्र नाही. तेथील प्राध्यापकांना संशोधन केंद्र असलेल्या इतर महाविद्यालयांत मार्गदर्शक म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. याला गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सकारात्मकता दर्शवून मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. मात्र परिपत्रक निघायला दिरंगाई होत आहे. या संदर्भातील परिपत्रक विद्यापीठाने त्वरित काढल्यास शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शक (गाइड) मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. प्रवीण जोगी, डॉ. मिलिंद भगत, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. दिलीप चौधरी, प्रा. नीलेश बेलखेडे आदींनी शक्य तितक्या लवकर परिपत्रक काढून आचार्य पदवी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

 

Web Title: Ph.D. Candidates who have cleared the entrance exam are referred for guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.