गावातील दारूबंदीसाठी थेट गृहमंत्र्यांनाच फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:11+5:302021-09-25T04:29:11+5:30
शंकरपूर : चिमूर तालुक्यातील महादवाडी येथे अवैधरीत्या देशी व मोह फुलाच्या दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने ...
शंकरपूर : चिमूर तालुक्यातील महादवाडी येथे अवैधरीत्या देशी व मोह फुलाच्या दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने सामाजिक आरोग्य बिघडत आहे. या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने अखेर थेट सरपंच यांनी गृहमंत्रालयाला फोन लावून गावाची हकीकत सांगितली.
तसेच अवैध दारू पकडून देणाऱ्याला सरपंचाकडून दोन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही करण्यात आली. महादवाडी येथे सात सदस्यीय ग्रामपंचायत असून या गावात हेमाडपंथी मंदिर आहे. गावात युवा सरपंच म्हणून भोजराज कामडी कार्यरत आहे. जवळपास सातशे ते आठशे लोकवस्ती असलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात देशी व मोहफुलांच्या दारूची विक्री होत आहे. इतकेच नाही तर याच गावातील लोक इतर परिसरातील खेड्यात दारूचा पुरवठा करीत आहेत. या दारूमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. या संदर्भात सरपंच भोजराज यांनी ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवैध दारू विक्रेत्यांनी भांडण करून मोठ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीसुद्धा दिल्याचे त्यांनी गृहमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. या दारूमुळे गावात वारंवार भांडण होणे, इतर गावांतून येणाऱ्या दारुड्यांचा त्रास आणि महिला मंडळींची छेड काढण्याचे प्रकार या गावात होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. याबाबत पोलिसातही तक्रार करण्यात आली आहे. पोलीस कोणती कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.