मोबाईलमुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय डबघाईस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:42 PM2018-01-22T23:42:33+5:302018-01-22T23:43:30+5:30
सतीश जमदाडे ।
आॅनलाईन लोकमत
आवाळपूर : पूर्वी छायाचित्रकाराने फोटो काढल्यानंतर चार-पाच दिवसानंतर तो हातात येई. यादरम्यान फोटो काढणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असायची. आता आधुनिक जगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. हातात सुसज्ज कॅमेरा असलेला मोबाईल आला. यामुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय मात्र डबघाईस आला आहे.
यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न फोटोग्राफर व्यावसायिकाला भेडसावत आहे. पूर्वी प्रत्येक कार्यक्रमात छायाचित्र टीपण्यासाठी फोटोग्राफरची आवश्यकता भासायची. त्याला या कामाची खास आर्डर दिली जायची. याशिवाय कुटुंबांचे फोटो, घरात लहान बाळ आले की त्याचे फोटो स्टुडीओत जाऊन काढले जात होते. परंतु आता फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची जागा स्मार्ट फोनने घेतली आहे. आता अनेक कार्यक्रमात फोटोग्राफरला तर बोलाविलेही जात नाही. मोबाईल फोननेच काम भागविले जाते.
अत्याधुनिक स्मार्टफोनमधील वेगवेगळ्या फिचर्समुळे डिजिटल कॅमेऱ्याप्रमाणे मोबाईल फोटोग्राफीला गुणवत्ता मिळत आहे. फोटो अॅप्सच्या सहाय्याने हवे असेल तसे छायाचित्रे टिपता येतात. एक फोन फायदे अनेक असल्यामुळे स्मार्ट फोनची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या फोटोग्राफीला हळूहळू लोक विसरत असल्याचे दिसून येत आहे.
डिजिटल कॅमेऱ्याची किंमत अधिक
डिजिटल कॅमेरा फोटोग्राफी योग्य आणि दर्जेदार फोटोसाठी ओळखला जातो. मात्र मोबाईल फोनच्या तुलनेत डिजिटल कॅमेरा अधिक महाग असल्याने नागरिक मोबाईल फोनलाच अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातही सारखीच स्थिती
मोबाईलमधील नवनवीन शोध आणि स्मार्ट फोनचा वाढता वापर, यामुळे व्यावसायिक स्टुडीओतील गर्दी कमी होऊ लागली आहे. शहरी भागानंतर ग्रामीण भागातही स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात पोहचला आहे. पूर्वी गावखेड्यातील कार्यक्रमात शहरातून खास फोटोग्राफर बोलावला जायचा. मात्र आता खेडोपाडी फोटोसाठी मोबाईलचाच वापर केला जाताना दिसून येत आहे.
केवळ लग्नसराईतच मागणी
व्यावसायिक फोटोग्राफरला प्रत्येक कार्यक्रमात बोलविले जात नसले तरी लग्नसराईतून फोटोग्राफर अद्याप बाद झालेला नाही. लग्नसराईत मोबाईलवर काम भागविले जात नाही. तिथे मात्र फोटोग्राफरला आवर्जुन बोलाविले जाते. त्यामुळे लग्नसराईची या व्यावसायिकांना आतूरतेने प्रतीक्षा असते.
मोबाईलच्या युगात मोजक्या कार्यक्रमाला आम्हाला बोलावणं असते. इतरवेळी मोबाईल काम करीत असते. केवळ लग्नसराईत व्यवसाय चालतो. इतर वेळेस हाताला काम नसते. त्यामुळे दुकान थाटून बसणे आता परवडण्यासारखे राहिले नाही.
- राजू मोहितकर,
फोटोग्राफर, नांदा