बसस्थानकावरील पॉकेटमारीला बसणार लगाम, सीसीटीव्हीची राहणार नजर
By परिमल डोहणे | Published: July 8, 2023 02:32 PM2023-07-08T14:32:47+5:302023-07-08T14:33:44+5:30
नव्या पोलिस चौकीचे लोकार्पण
चंद्रपूर : शहरातील बसस्थानक परिसरातील पॉकेटमारीला लगाम लावण्याच्या अनुषंगाने बसस्थानक परिसरात पोलिस चौकी गठित करण्यात आली आहे. गुरुवारी या पोलिस चौकीचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. चंद्रपूर बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन किंवा बसमध्ये चढताना पॉकेट, मोबाइल, दागिने, लेडिज पर्स पळविल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
याला आळा घालण्याच्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रण अधिकारी स्मिता सुतावने, नियंत्रण अधिकारी मंगेश डांगे यांनी मोक्याची जागी उपलब्ध करून दिली. त्या जागेची नीट सफाई व रंगरंगोटी करून तेथे पोलिस चौकी थाटण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते या बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. सहायक वाहतूक निरीक्षक हेमंत गोवर्धन, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार, रामनगरचे ठाणेदार राजेश मुळे, सहायक पोलिस निरीक्षक अमरदीप खाडे, सफौ गजानन डोईफोडे, पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आठ सीसीटीव्ही कॅमेरे
बसस्थानक परिसरात रामनगर पोलिसांनी लोकसहभागातून आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सतत ध्वनिक्षेपकाद्वारे अनाउन्समेन्ट करण्यात येत आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथक, बिट अंमलदार, चार्ली, गुन्हे शोध पथक अधिकारी /अंमलदार यांनी सतत गस्त सुरू केली आहे. बसस्थानक परिसरात एखादी संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिस स्टेशन रामनगर ०७१७२-२५३२०० व डायल ११२ येथे माहिती देण्याचे आवाहन केले आहे.