वापरलेले इंजेक्शन्स खाताच्या ढिगाऱ्यावर; उपसरपंचांकडून चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 07:54 PM2021-06-05T19:54:42+5:302021-06-05T19:56:11+5:30
भुरसे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली त्यानंतर भुरसे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर मडावी यांना बोलावून माहिती दिली
सावली (चंद्रपूर): तालुक्यातील सोनापूर येथे खाताच्या ढिगाऱ्यावर रिकामे इंजेक्शन्स अस्ताव्यस्त आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यासह ग्रामीण भागातही कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाकडून नागरिकांना मोफत लसीकरणाचे काम आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. याचदरम्यान सोनापूर येथे २८ मे रोजी ४५ वर्षांवरील ३० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर काही दिवसांनी रिकामे इंजेक्शन्स खाताच्या ढिगाऱ्यावर अस्ताव्यस्त उघड्यावर पडलेले दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी उपसरपंच मुकेश भुरसे यांना या प्रकरणाची माहिती दिली.
भुरसे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली त्यानंतर भुरसे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर मडावी यांना बोलावून माहिती दिली. याबाबत चौकशी केली असता संबंधित लसीकरण करणाऱ्या परिचारिका यांनी लसीकरण केलेले सर्व रिकामे इंजेक्शन्स नष्ट केल्याचे सांगितले. परंतु रिकामे इंजेक्शन्स गावाच्या वेशीवर टाकले कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या इंजेक्शन्समुळे गावातील आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच गावावर कोविडचे संकट येऊन गेले होते. तसेच तापाची साथही होती. आणि यामुळे जर कुणाला संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपसरपंच भुरसे यांनी आरोग्य विभागाला केला आहे. फेकलेले इंजेक्शन्स शासनाचे नसतील तर कोणत्या खासगी डॉक्टरचे आहेत का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोनापूरवासीयांनी केली आहे.
मिळून आलेल्या इंजेक्शन्सची चौकशी केली असता ते सन २०१८ चे असल्याचे निष्पन्न झाले. गावात २६ मे रोजी करण्यात आलेल्या लसीकरणादरम्यान वापरण्यात आलेले इंजेक्शन्स नष्ट करण्यात आले आहे.
- डॉ. मनोहर मडावी, तालुका आरोग्य अधिकारी, सावली