गोळी घ्या गोळी ...
By Admin | Published: January 8, 2015 10:51 PM2015-01-08T22:51:18+5:302015-01-08T22:51:18+5:30
शहरातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा मिळावी यासाठी महानगर पालिकेमार्फत नागरी आरोग्य केंद्र चालविले जात आहे. मात्र, या रुग्णालयात कॅप्सूल-गोळ्यापुढे उपचार होत नाही.
मनपाच्या आरोग्य केंद्रात नाममात्र उपचार
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
शहरातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा मिळावी यासाठी महानगर पालिकेमार्फत नागरी आरोग्य केंद्र चालविले जात आहे. मात्र, या रुग्णालयात कॅप्सूल-गोळ्यापुढे उपचार होत नाही. मोहीमेच्या नावाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेहमीच वाऱ्या सुरु असतात. आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी केवळ गोळी घ्या, गोळी... असा सल्ला देत असल्याने रुग्णांनी रुग्णालयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशन दरम्यान दिसून आले. तुकूम येथील आरोग्य केंद्रात गेल्या कित्येक दिवसांपासून बाह्य रुग्ण नोंदणी झालेली नसल्याचे यावेळी दिसून आले.
चंद्रपूर शहर मनपा हद्दीत महानगर पालिकेचे सात नागरी आरोग्य केंद्र सुरु आहेत. या सात आरोग्य केंद्रांमार्फत वॉर्डातील नागरिकांना कोणत्याही आजारावर प्राथमिक उपचार देण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, डॉक्टरांची गैरहजेरी, कर्मचाऱ्यांची मनमानी अशा विविध कारणांमुळे वॉर्डातीलच नागरिक या आरोग्य केंद्राकडे फिरकत नसल्याचे चित्र स्टिंग आॅपरेशन दरम्यान दिसून आले.
सुपर मार्केट येथे असलेल्या झोन ६ च्या आरोग्य केंद्राला भेट दिली असता, एक इसम आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात आला होता. महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांने मुलाची तपासणी करून औषधाची चिठ्ठी लिहून दिली. मात्र, त्यांना रुग्णालयातच औषधे, गोळ्या मिळत असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे ते चिठ्ठी घेऊन औषधालयात जायला निघाले. परंतु, प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांना थांबवून विचारपूस केली असता, हा प्रकार डॉक्टरांच्या निदर्शनास आला. त्यामुळे येथे कार्यरत आरोग्य सेविकेने त्यांना परत बोलावून औषधे रुग्णालयात मिळत असल्याचे सांगत सावरासावरीचा प्रयत्न केला. असे प्रकार नेहमीच घडत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
बगड खिडकी येथे झोन क्रमांक ४ चे नागरी आरोग्य केंद्र आहे. छोट्याशा इमारतीत सुरु असलेल्या या आरोग्य केंद्रात एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र, कार्यरत कर्मचाऱ्यांनी डिसेंबर महिन्यात १२६ रुग्णांची नोंद झाल्याचे सांगितले. बाबुपेठ येथील रुग्णालयात पोलिओ लसीकरण संदर्भात आशा वर्कर महिलांची सभा सुरु होती. त्यामुळे या रुग्णालयातही कोणताही रुग्ण आढळून आला नाही.
बालाजी वॉर्ड येथे असलेल्या आरोग्य केंद्रातील अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी पोलिओ लसीकरण कार्यक्रमासाठी गेल्याचे उपस्थित महिला शिपायाने सांगितले. रामनगर येथील नागरी आरोग्य केंद्रातही रुग्णांचा पत्ता नव्हता. सर्व कर्मचारी पोलिओ लसीकरणाच्या कामात व्यस्त होते. रुग्णांसदर्भात माहिती विचारली असता, देण्यास नकार देऊन सर्व ‘आॅल इज वेल’ सुरु असल्याचे सांगितले.
तुकूम येथील आरोग्य केंद्रात कित्येक दिवसांपासून रिक्त असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद डिसेंबर महिन्यात भरण्यात आले. त्यामुळे आतापर्यत ओपीडीत रुग्णांची नोंदच झाली नसल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मनपाची आरोग्य सेवा किती प्रभावी आहे, हे दिसून येते.