मत्स्योत्पदनासाठी पथदर्शी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:18 AM2018-06-08T00:18:18+5:302018-06-08T00:18:18+5:30
महाराष्ट्राला दूध, अंडी आणि मासोळी या आवश्यक खाद्यपदार्थांसाठी स्वयंपूर्ण बनविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील भूजलसाठ्याचा वापर करण्यात येणार आहे. विदर्भातील पारंपारिक मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाचा, संशोधनाचा व अद्ययावत सुविधांचा हातभार लावत .....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्राला दूध, अंडी आणि मासोळी या आवश्यक खाद्यपदार्थांसाठी स्वयंपूर्ण बनविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यासाठी पूर्व विदर्भातील भूजलसाठ्याचा वापर करण्यात येणार आहे. विदर्भातील पारंपारिक मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाचा, संशोधनाचा व अद्ययावत सुविधांचा हातभार लावत राज्याची या क्षेत्रातील स्वयंपूर्णता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मत्स्य व्यवसायिकांनपुढे व्यक्त केला.
चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात गुरुवारी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायकाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. राज्य शासन दर महिन्याला ४५० कोटी रुपयांचे दूध, अंडी आणि मासोळी अन्य राज्यातून आयात करत असल्याचे ना. जानकर यांनी सांगितले. मात्र ही आयात बंद करून राज्याच्या तिजोरीला आणि स्वयंपूर्णतेला विदर्भातील मत्स व्यवसायिक व शेतकरी मदत करू शकतात. त्यामुळेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाला गती देण्यासाठी अनेक प्रयोग आगामी वर्षभरात केले जाणार आहेत.
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये तलाव व जलसाठे मोठ्या प्रमाणात आहेत. या भागामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळू शकते. या पद्धतीच्या व्यवसायाची पाळेमुळे या ठिकाणी रुजलेली आहे. त्याला आधुनिक स्वरूप देऊन व आवश्यक मदत देऊन प्रशिक्षण व संशोधन उपलब्ध करून आणखी गती देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठी या दोन जिल्ह्यांमध्ये या व्यवसायाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू आशितोष पातूरकर, चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जांभुळे, चंद्रपूर बांधकाम विभागाचे अभियंता जुनारकर यांनी विदर्भातील मत्स्यव्यवसाय, मत्स्यव्यवसाय संशोधनाची विदर्भातील गरज, चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांची सद्यस्थिती व फिश मार्केट उभारण्याची आवश्यकता आदींबाबत सादरीकरण केले.
कोणतेही प्रकल्प उभारताना स्थानिक व्यावसायिकांच्या मतांचा आदर करा ,असे निर्देश यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या सादरीकरणामध्ये महाराष्ट्रातील पहिले गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारणीबाबत महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत प्राप्त झाला असून याठिकाणी या केंद्राची आवश्यकता असल्याचे निष्कर्ष आजच्या बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर यांनी मांडले.
पाण्याची उत्तम सुविधा असणाऱ्या आणि संपर्काची साधने उपलब्ध असणाºया ठिकाणी काही हेक्टर परिसरात राज्यातील हे पहिले केंद्र उभे राहणार आहे. या केंद्रामध्ये मत्स्यबीज निर्मिती, शोभिवंत माशांच्या प्रजातींची निर्मिती, प्रजनन केंद्र, व्यवसाय संशोधन, कमी पाण्यातील मत्स्यबीज निर्मिती याबाबतचे संशोधन व विकास कार्य चालणार आहे. उभय नेत्यांनी या प्रकल्पासाठी तत्वत: मान्यता आज दिली आहे. तथापि, योग्य जागा शोधण्याची निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
रिक्त पदांची भरती करावी
गुरुवारच्या बैठकीमध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांच्या वतीने जिल्ह्यातील काही समस्या महादेव जानकर यांच्या लक्षात आणून दिल्या. या भागातील मत्स्य व्यवसायाला गती देण्यासाठी या विभागातील रिक्त पदांची भरती करण्यात यावी, दोनशे विद्यार्थ्यांना जेवण व राहण्याच्या व्यवस्थेसह प्रशिक्षित करण्यात यावे, मत्स्यखाद्य निर्मितीला चालना द्यावी, आधुनिक व स्वस्त दराच्या बोटी मासेमारीसाठी उपलब्ध करण्यात याव्यात, बंद पडलेले मत्स्य बीज निर्मिती केंद्र पुनर्जीवित करण्यात यावे, तलावाचे खोलीकरण करण्यात यावे,बोगस संस्था बंद करण्यात याव्यात, लघु मत्स खादय कारखाना निर्मितीसाठी अनुदान देण्यात यावे व मत्स्यबीज ते मार्केटिंग असा प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित व्हावा, अशी सूचना केली.