पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:47 PM2018-04-09T23:47:28+5:302018-04-09T23:47:28+5:30
तालुक्यात १४७ गावे असून ८१ ग्रामपंचायती आहे. यामध्ये नव्याने एक गाव, एक ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्र व एक अंगणवाडीची येत्या काही महिन्यात भर पडणार आहे. वरोरा तालुक्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन होणार असून या कामाला सुरूवात झाली आहे. पुनर्वसनाची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : तालुक्यात १४७ गावे असून ८१ ग्रामपंचायती आहे. यामध्ये नव्याने एक गाव, एक ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्र व एक अंगणवाडीची येत्या काही महिन्यात भर पडणार आहे. वरोरा तालुक्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि.) गावाचे पुनर्वसन होणार असून या कामाला सुरूवात झाली आहे. पुनर्वसनाची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असावा, मानवी हस्तक्षेप नसावा याकरिता मागील काही वर्षांपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गावांचे इतरत्र पुर्नवसन करण्याचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. यापूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खातोडा, वनली या गावांचे वरोरा तालुक्यातील वनविभागाच्या जागेवर पुर्नवसन करण्यात आले. त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पिंपळगाव (शि) या गावाचे वरोरा-चिमूर मार्गालगत सालोरा गावानजीक वनविभागाच्या ७०० एकर जागेमध्ये ५२ कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या कुटुंबियानी होकार दिल्याने वनविभागाने त्यांच्यासाठी पुनर्वसित जागेत घराचे बांधकाम सुरु केले आहे.
एका कुटुंबास शेतीकरिता पाच एकर जमीन, घराकरिता दोन हजार स्केअर फूट जागा व पक्के स्लॅबचे घर बांधण्यात येणार आहे. पुनर्वसन वस्ती मध्ये पथदिव्यांसोबतच विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यासोबत पिण्याच्या पाण्याकरिता सौरउर्जेवरचे पंप बसविण्यात आले आहे. सौर उर्जेचे पथदिवे, दहा घर मिळून एक सौर ऊर्जा पाणी पंप देण्यात आला आहे. प्रत्येक घरावर एक पाण्याची टाकी ठेवली जाणार असून घरात पाणी पुरवठा पाईप लाईन तसेच घरातील विद्युतीकरणही करुन दिले जाणार आहे. यासोबत या पुनर्वसित पळसगाव (शि) गावात ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व शाळेच्या इमारती बांधण्यात आल्या आहे. सध्या पोच व अंतर्गत रस्त्याची कामे जोमात सुरू आहेत.
घर तिथे शौचालय
नागरिकांना घरे बांधून देत असताना भारत स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधले जाणार आहेत. त्यामुळे गावात स्वच्छ राहण्यास मदत होईल, असा विश्वास वनविभाग व्यक्त करीत आहे.
जून- जुलै महिन्यातच पूर्नवसनाची कामे पूर्ण करण्याची तयारी करण्यात आली आहे. जर पावसाळा लवकर सुरु झाल्यास दोन ते महिने कामे होणार नसले तरी डिसेंबर महिन्यात पूर्नवसीत झालेल्या पळसगाव (शि) ये कुटुंब वास्तव्यास येतील.
- गजेंद्र नरवने, उपसंचालक (बफर)
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,
चंद्रपूर