नळ असतानाही पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:26+5:302021-05-31T04:21:26+5:30

सावली : घरी अड (विहीर) आणि पाण्याची रड अशी म्हण प्रचलित आहे. असाच प्रत्यय सावली नगरात येत आहे. महिना, ...

Pipes for water even when there is a tap | नळ असतानाही पाण्यासाठी पायपीट

नळ असतानाही पाण्यासाठी पायपीट

Next

सावली : घरी अड (विहीर) आणि पाण्याची रड अशी म्हण प्रचलित आहे. असाच प्रत्यय सावली नगरात येत आहे. महिना, दोन महिन्याने नगरात पाण्याची समस्या निर्माण होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पाणी पुरवठा योजनेची नळ जोडणी घरोघरी असूनही पाण्यासाठी पायपीट करण्याचा त्रास नगरातील महिलांना सहन करावा लागत आहे.

हा नगर प्रशासनाचा नाकर्तेपणाच आहे, असे आता नगरवासी बोलायला लागले आहेत. पाणी पुरवठा योजनेच्या सुरुवातीपासूनच ही समस्या सावलीकरांच्या पाचवीला पुजली आहे. नगराच्या पाणी पुरवठ्यासाठी तीन मोटारपंप असतानासुद्धा सतत महिना, दोन महिन्याने होणाऱ्या या समस्येमुळे माता-भगिनी त्रासून गेल्या आहेत. नगर प्रशासनाच्या मनमौजी आणि अडेलतट्टू धोरणाने पाणी समस्या कायमची झाली आहे. चांगल्या दर्जाचे तीन मोटारपंप असतानासुद्धा अशी समस्या वारंवार भेडसावत असेल तर ही समस्या मानवनिर्मित असल्याचे बोलले जात आहे. पाणी पुरवठ्यासाठी एकाच पंपाची गरज असतानाही तत्कालीन ग्रामपंचायतने तीन मोटार पंपाची तजवीज करून ठेवली आहे. मात्र नगर पंचायत प्रशासन दररोज पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. दोन पंप नादुरुस्त झाल्यानंतर ते दुरुस्त करून ठेवणे गरजेचे असताना तिसराही पंप बिघडण्याची वाट पाहात वेळ घालवणे, हा नागरिकांना जाणिवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. सावली शहरात नव्याने जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी होत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या कायमची सुटेल हा आशावाद असतानाच तत्पूर्वी मात्र पाणीपुरवठ्याच्या प्रशासनिक समस्येने शहरवासी पुरते त्रस्त झाले आहेत. सतरा सदस्यांची मुदत आठ महिन्यापूर्वी संपुष्टात आली आहे. त्यामुळे कुणाचा अंकुश प्रशासनावर राहिला नाही. आणि याच कारणाने प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू झाला असल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: Pipes for water even when there is a tap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.