नळ असतानाही पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:06+5:302021-06-01T04:21:06+5:30
सावली : घरी आड (विहीर) आणि पाण्याची रड अशी म्हण प्रचलित आहे. असाच प्रत्यय सावलीनगरात येत आहे. महिना, दोन ...
सावली : घरी आड (विहीर) आणि पाण्याची रड अशी म्हण प्रचलित आहे. असाच प्रत्यय सावलीनगरात येत आहे. महिना, दोन महिन्यांनी नगरात पाण्याची समस्या निर्माण होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पाणीपुरवठा योजनेची नळजोडणी घरोघरी असूनही पाण्यासाठी पायपीट करण्याचा त्रास नगरातील महिलांना सहन करावा लागत आहे.
हा नगर प्रशासनाचा नाकर्तेपणाच आहे, असे आता नगरवासी बोलायला लागले आहेत. पाणीपुरवठा योजनेच्या सुरुवातीपासूनच ही समस्या सावलीनगरवासीयांच्या पाचवीला पूजली आहे. नगराच्या पाणीपुरवठ्यासाठी तीन मोटरपंप असतानासुद्धा सतत महिना, दोन महिन्यांनी होणाऱ्या या समस्येमुळे माता-भगिनी त्रासून गेल्या आहेत. नगर प्रशासनाच्या मनमौजी आणि अडेलतट्टू धोरणाने पाणी समस्या कायमची झाली आहे. चांगल्या दर्जाचे तीन मोटरपंप असतानासुद्धा अशी समस्या वारंवार भेडसावत असेल तर ही समस्या मानवनिर्मित असल्याचे बोलले जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी एकाच पंपाची गरज असतानाही तत्कालीन ग्रामपंचायतने तीन मोटर पंपांची तजवीज करून ठेवली आहे, मात्र नगरपंचायत प्रशासन दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. दोन पंप नादुरुस्त झाल्यानंतर ते दुरुस्त करून ठेवणे गरजेचे असताना तिसराही पंप बिघडण्याची वाट पाहात वेळ घालवणे, हा नागरिकांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. सावली शहरात नव्याने जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी होत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या कायमची सुटेल हा आशावाद असतानाच तत्पूर्वी मात्र पाणीपुरवठ्याच्या प्रशासनिक समस्येने शहरवासी पुरते त्रस्त झाले आहेत. सतरा सदस्यांची मुदत आठ महिन्यांपूर्वी संपुष्टात आली आहे. त्यामुळे प्रशासनावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. आणि याच कारणाने प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू झाला असल्याचेही बोलले जात आहे.