तेलंगणाला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था
By admin | Published: July 18, 2015 12:54 AM2015-07-18T00:54:46+5:302015-07-18T00:54:46+5:30
राजुरा तालुक्यातील देवाडा, तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राजुरा-तुलाना-लक्कडकोट रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा त्रास वाढला
देवाडा: राजुरा तालुक्यातील देवाडा, तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राजुरा-तुलाना-लक्कडकोट रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे पाच वर्षापूर्वी बांधकाम केले होते. मात्र त्यानंतर याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरुन जाताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, हेच समजत नाही.
रस्त्यावर जागोजागी खडे पडले असून खड्ड्यात दिवसागणीक वाढच होत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप पसरला आहे. तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते फार खराब झालेले आहेत. या भागातील बहुतांश जनता तेलगू भाषिक असल्याने त्यांचा संपर्क तेलंगणा प्रदेशाशी जास्त असतो. त्यामुळे त्यांना तेलंगणात ये-जा करावे लागते, तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या मार्गात महाराष्ट्रातील लक्कडकोट, कोष्टाळा, घोट्टा आनंद गुड्डा, जंगू गुडा पारधी गुडा, सिद्धेश्वर देवाडा, येरगव्हान, सोंडो, सोनुर्ली, भुर्रकुंडा भेदोडा, वरुर रोड, टेंबुरवाही साखरवाही, तुलाना, सुमठाना आदी गावे येतात. या मार्गावरुन फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे पादचारी, दुचाकी, प्रवासी आॅटो चारचाकीस्वारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तेलंगाणा प्रदेशाला जोडणाऱ्या या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे महामंडळाची बस नियमित वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे परिसरातील प्रवाशांचे हाल होत आहेत. दरवर्षी १०० ते १५० कोटी रुपये रस्ते बांधकाम व डागडुजीवर खर्च करुनही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची अवस्था बिकटच आहे. दिवसेंदिवस वाहनाची संख्या वाढतच आहे. मालवाहू ट्रकांना दहा टनाची मर्यादा देण्यात आली. पण कमी वेळात जास्त वाहतूक करण्याच्या लालसेपोटी वाहतुकदार एका ट्रकमध्ये १५ ते १८ टन माल भरतात. त्यामुळे अवजड वाहतुकीने रस्त्याचे बेहाल झाले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करुन या वाहतुकीला एक प्रकारे समर्थनच देत आहे. वाहतूक पोलिसांचाही यात वाटा असल्याचे बोलले जाते. ग्रामीण भागातील अनेक रस्तेच गायब झाले आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)
पावसामुळे त्रास वाढला
पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असून रस्ता अधिक धोकादायक बनला आहे. खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे मोठ्या खड्ड्यात वाहन गेल्यास अपघात घडण्याची शक्यता असते. अनेकदा अपघात घडून नागरिकांना अपंगत्व आले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.