तेलंगणाला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 12:51 AM2016-07-07T00:51:23+5:302016-07-07T00:51:23+5:30
राजुरा तालुक्यातील देवाडा येथून तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या भेंडवी-कावळगोंदी-येरगव्हाण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : खड्यांमुळे वाहनधारकांचा त्रास वाढला
देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा येथून तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या भेंडवी-कावळगोंदी-येरगव्हाण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी बांधकाम केले होते. मात्र, त्यानंतर याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे.
रस्त्यावरुन जाताना खड्डयात रस्ता की रस्त्यात खड्डा, हेच समजत नाही. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून खड्यात दिवसागणिक वाढतच होत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांत संताप पसरला आहे. तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते फार खराब झालेले आहेत. या भागातील बहुतांश जनता तेलगू भाषिक असल्याने त्यांचा संपर्क तेलंगणा प्रदेशाशी जास्त असतो. त्यामुळे त्यांना तेलंगणात ये-जा करावे लागते. तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या मार्गात महाराष्ट्रातील पाचगाव, रानवेल्ली, भेदोडा, भेडवी, कावळगोंदी, येरगव्हान, भुर्रंकुडा बु., भुर्रंकुडा खुर्द, काकळघाट, उमरझरा, गेरेगुडा, सुकडपल्ली, सोनुर्ली, सुमठाणा, लक्कडकोट, घोट्टा, कोष्टाळा आदी गावे येतात. या मार्गावरुन फार मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. त्यामुळे पादचारी, दुचाकी, चारचाकी स्वारांना त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)