खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:33 PM2018-07-13T23:33:54+5:302018-07-13T23:34:43+5:30

चंद्रपूरच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शुक्रवारी आणखी एका १९ वर्षीय युवतीचा बळी घेतला. काजल पाल असे या दुदैवी मुलीचे नाव असून ती बंगाली कॅम्प परिसरातील रहिवासी आहे. बंगाली कॅम्पकडून सावरकर चौकाकडे जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ती खाली पडली. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने तिला चिरडले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

Pits took one more wicket | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी

खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी

Next
ठळक मुद्देबेजबाबदारपणाचा कळस : खड्ड्यांची श्रृंखला किती घेणार जीव ?

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शुक्रवारी आणखी एका १९ वर्षीय युवतीचा बळी घेतला. काजल पाल असे या दुदैवी मुलीचे नाव असून ती बंगाली कॅम्प परिसरातील रहिवासी आहे. बंगाली कॅम्पकडून सावरकर चौकाकडे जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ती खाली पडली. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकने तिला चिरडले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातानंतर परिसरात मोठा तणाव पसरला असून लोकांनी या भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. पावसाळा सुरु होताच बंगाली कॅम्प परिसरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहे. राजकीय पक्षांनी याबाबत आंदोलन करुनदेखील हे खड्डे बुजविण्यात आलेले नाही. या खड्ड्यांकडे महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी या खड्ड्यांमुळे नंदा बेरहम या शिक्षिकेलाही जीव गमवावा लागला होता. यावेळी ‘लोकमत’ने शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधले होते. मात्र मनपा प्रशासन व बांधकाम विभागाला जाग आली नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी काजल पाल ही दुचाकीने सावरकर चौकाकडे जात असताना खड्ड्यामुळे ती दुचाकीसह खाली पडली. याचवेळी ट्रकने तिला चिरडले.

काँग्रेस पदाधिकारी रस्त्यावर
चंद्रपूर शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे भवानजीभाई शाळेच्या शिक्षिका नंदा प्रमोद बेहराम व काजल पाल नावाच्या मुलीचे बंगाली कॅम्प येथे अपघाती निधन झाले. सात दिवसांमध्ये दोन जीव या चंद्रपूर शहरातील खड्ड्यांनी घेतले आहे. या जीवहानीला येथील लोकप्रतिनिधी, मनपा व बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीने केला आहे. प्रशासनाचा निषेध करण्याकरिता नंदा प्रमोद बेहराम यांच्या व काजलच्या प्रतिमेस अभिवादन करुन वाहतूक शाखा ते आदर्श पेट्रोलपंपपर्यंत जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने काँग्रेस कमिटीने खड्ड्यांवर गिट्टी व मुरुम टाकून प्रशासनाचे लक्ष वेधले. खड्डे बुजाओ, जान बचाओ, खड्ड्यात नेवून ठेवलाय चंद्रपूर माझा, अशा घोषणा देत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने निषेध करण्यात आला. मिलन चौक ते बिनबा गेट, वाहतूक शाखा ते बंगाली कॅम्प, बंगाली कॅम्प ते एमईएल, जटपुरा गेट ते राम नगर चौक, राम नगर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वडगाव परिसर, दे. गो. तुकूम, राष्टÑवादी नगर, रज्जा चौक, समाधी वॉर्ड अशा अनेक परिसरामध्ये मोठमाठे खड्डे पडलेले आहेत. येत्या आठ दिवसात हे खड्डे बुजविण्यात आले नाही, तर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अधिकाºयांचा तोंडाला काळे फासून मंत्र्यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा काँग्रेस पदाधिकाºयांनी दिला. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, महाराष्टÑ प्रदेश सरचिटणीस नंदा अल्लूरवार, सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. मलक शकीर, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन कत्याल, अनिल सुरपम, केशव रामटेके उपस्थित होते.

अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने अर्थसहाय्य द्या
सुधीर मुनगंटीवार यांचे मनपा व बांधकाम विभागाला निर्देश
चंद्रपुरात झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीने अर्थसहाय्य देण्यात यावे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर आणि सार्वजननिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता यांना दिले आहेत. शहरात झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा बळी गेला, ही अतिशय दुदेर्वी घटना असून या घटनांची पुनरावृत्ती होवू नये, या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यात यावी. अन्यथा महानगरपालिकेवर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे कडक निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

Web Title: Pits took one more wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.