२० टक्के गावांच्या १०० टक्के लसीकरणाचे नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:31+5:302021-06-18T04:20:31+5:30
चंद्रपूर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रात किमान एक वॉर्ड तर जिल्हाभरात ...
चंद्रपूर : कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरी क्षेत्रात किमान एक वॉर्ड तर जिल्हाभरात किमान २० टक्के गावांचे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. कोरोनाविषयक कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार आदी उपस्थित होते. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे नमूद करून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, चंद्रपूर मनपा क्षेत्र आणि जिल्ह्यातील प्रत्येक न. प. क्षेत्रात किमान एका वॉर्डात पात्र नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करावे. यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने वॉर्डनिहाय बैठका घ्याव्यात. ज्यांनी लसीकरण केले आहे, अशा नागरिकांचाही जागृतीसाठी प्रभावी वापर करावा. वॉर्डात गठित झालेल्या कोरोना नियंत्रण समित्यांनाही सक्रिय करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात १६१५ गावे आहेत. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील किमान २० टक्के गावांचे २०० टक्के लसीकरण करण्यासाठी नियोजन करावे. लस उपलब्धतेबाबत पोर्टलवर माहिती भरावी. त्यानुसारच जिल्ह्याचा लसींचा साठा उपलब्ध होणार आहे, असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.
विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरण केंद्र
विदेशात शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरी व ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंसाठी डीईआयसी बिल्डिंग, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे बुधवारी २३ जून २०२१ रोजी लसीकरण केंद्र तयार करण्यात येणार आहे. या केंद्रावर पहिला डोस आणि ज्यांना पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले त्यांना दुसरा डोस (फक्त कोविशिल्ड लस) देण्यात येईल, असा निर्णय कृती दलाच्या बैठकीत घेण्यात आला.