पाणी टंचाई भासणार नाही असे नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:09 AM2017-09-02T00:09:09+5:302017-09-02T00:09:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील व जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, याचे अचूक नियोजन करा. पारंपरिक स्त्रोत जिवंत करा. कामांची गती वाढवा, अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगारावा लागेल, अशा शब्दात राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे अधिकाºयांचा क्लास घेतला.
चंद्रपूर महानगर व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमध्ये यावर्षीच्या पावसाची उपलब्धता बघता, ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पाणी टंचाई संदर्भात सामान्य नागरिकांना सध्या कुठल्याही पाणी कपातीला सामोरे जाण्याचे काम पडू देऊ नका. उपलब्ध जलसाठ्याचे बळकटीकरणाची मोहिम पुढील काही दिवस राबविण्याचे नियोजन करण्याचेही स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात अत्यंत कठीण परिस्थितीत देखील पुढील अनेक वर्षात समस्या राहू नये, यासाठी धानोरा-आमडी या ठिकाणच्या बॅरेजचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी महापालिकेने सूचविलेल्या उपाय योजनांना मर्यादित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांना दिले. यावेळी पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विद्युत वितरण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच जिल्हा परिषद, मनपा व नगरपालिकेच्या अधिकाºयांशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. बैठकीला आ. नाना श्यामकुळे, आ. अॅड. संजय धोटे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे उपस्थित होते.
पाणी कपातीचा प्रस्ताव नाकारला
संभाव्य पाणी टंचाई बघता पाणी पुरवठा एक दिवस आड करणे, नवीन नळ कनेक्शन बंद करणे आदी प्रकार करु नका. चंद्रपूर शहरातील नागरिकांना एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा प्रस्ताव पालकमंत्र्यांनी नाकारला. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा आरक्षित पाणीसाठा प्रसंगी वापरला तरी चालेल. मात्र शहरातील सामान्य नागरिकाला पिण्याच्या पाण्यासाठी त्रास होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाणी समस्येवर बुधवारी मुंबईत बैठक
चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्यासाठी पाऊस न झाल्यास चारगाव धरण, लालनाला प्रकल्प, गोसेखूर्द प्रकल्प, माना खाण, धानोरा स्त्रोत आदी ठिकाणच्या शक्यता तपासून पाहण्यात आल्या. या संदर्भात ६ सप्टेंबरला मुंबईत बैठक होणार असून संभाव्य पाणी टंचाईवर यामध्ये काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.