सिंचन विहीर योजना जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:39 PM2018-01-16T23:39:08+5:302018-01-16T23:39:28+5:30
तालुक्यामध्ये मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत अनेक शेतकरी लाभार्थ्यांनी धडक सिंचन विहीर योजनेसाठी अर्ज केले.
आॅनलाईन लोकमत
पोंभुर्णा : तालुक्यामध्ये मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत अनेक शेतकरी लाभार्थ्यांनी धडक सिंचन विहीर योजनेसाठी अर्ज केले. त्यानुसार मंजूर झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये झपाट्याने विहीर बांधकाम सुरू केल्याने सद्यस्थितीत तालुका परिसरामध्ये हे काम प्रगतिपथावर दिसून येत आहे.
शासनाने ग्रामीण भागातील सिंचन व्यवस्था बळकट करण्यासाठी मागेल त्याला शंभर टक्के अनुदानावर विहीर देण्याचे घोषित केले. त्यामुळे तालुक्यातील ५९८ शेतकऱ्यांनी धडक विहीर योजनेसाठी अर्ज केले. त्यानुसार ४६९ विहीरींचे कार्यारंभ आदेश तयार झाले तर ४१४ सिंचन विहिरीचे मागील वर्षी ले-आऊट देण्यात आले होते. त्यानुसार विहीरीचे बांंधकाम पुर्ण करण्यात आले. मात्र हे काम झाल्यानंतर पावसाळा तोंडावर आल्याने आणि पाहिजे त्या प्रमाणात बांधकाम करणारे मिस्त्री व साहित्य उपलब्ध होत नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीचे काम खोदकामापासूनच अपूर्ण राहिले होते. परंतु यावर्षी पोंभुर्णा येथील कार्यरत पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी तालुक्यातील सिंचन व्यवस्थेकडे करडी नजर ठेऊन येथील कर्मचाºयांना तत्काळ तालुक्यातील सिंचन विहिरींचे बांधकाम करण्याचे आदेश दिले असून ते स्वत: शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करीत आहेत. त्यामुळे यावर काम करणारे संंबधित इंजिनीअर व कर्मचारी शिघ्र गतीने ले-आऊट देण्याचे काम करीत असून मागील दोन आठवड्यापासून हे काम मोठ्या जोमात सुरू आहे. यातच तालुक्यामध्ये खोदकाम झालेल्या विहिरीचे अनुदान तत्काळ मिळत असल्याने पोंभुर्णा तालुक्यात धडक सिंचन विहीर योजनेने चांगलीच धडक घेतली आहे.