सिव्हरेज योजनेला नियोजनशून्यतेचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2016 12:49 AM2016-06-11T00:49:18+5:302016-06-11T00:49:18+5:30
चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भूमिगत मलनिस्सारण योजना सहा वर्र्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली.
कामे पुन्हा ठप्प : विकास आराखड्यात आणखी वाढीव पाईपलाईन प्रस्तावित
रवी जवळे चंद्रपूर
चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भूमिगत मलनिस्सारण योजना सहा वर्र्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली. मात्र प्रारंभापासून या योजनेत नियोजनाची ऐसीतैसी करण्यात आल्याने ही योजना सहा वर्षातही पूर्णत्वास येऊ शकली नाही. ७० कोटींची ही योजना आता सुमारे सव्वाशे कोटींवर जाऊन पोहचली आहे. पठाणपुरा व रहमतनगर येथे यासाठी सिव्हरेज प्लांट तयार केले आहे. मात्र तेदेखील सदोष असल्याने योजनेला ग्रहण लागले आहे.
विशेष म्हणजे, या योजनेच्या फलश्रुतीवर मनपातील अधिकारी व पदाधिकारी सकारात्मक भाष्य करू शकत नाही. तरीही प्रस्तावित शहर विकास आराखड्यात या योजनेला शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आणखी वाढविण्याचे प्रस्तावित केले आहे.
चंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर हळूहळू विकास कामे केली जात आहे. मात्र शहराचा चेहरामोहरा अद्याप बदलू शकला नाही. २००७ मध्येच या भूमिगत मलनिस्सारण योजनेबाबत नगरपालिका स्तरावर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तेव्हा या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरीही देण्यात आली होती. २००९-१० मध्ये भूमिगत मलनिस्सारण योजना हाती घेण्यात आली. या योजनेचे कंत्राट शिवास्वाती कन्स्ट्रक्शन कंपनी, हैदराबाद यांना देण्यात आले. २००९ मध्येच वर्क आॅर्डरही निघाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. दोन वर्षात म्हणजे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र प्रारंभापासून या योजनेला समस्यांचे ग्रहण लागत आले. रस्ते, वीज केबल आदी अनेक बाबींमुळे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आली नाही. त्यानंतर योजनेच्या कामाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आले. मात्र २०१२ पर्यंतही संबंधित कंपनीने हे काम पूर्ण केले नाही. त्यानंतर २०१३ पर्यंत पुन्हा मुदत वाढ दिली. आता २०१६ उजाडले आहे. मात्र भूमिगत मलनिस्सारण योजनेचे काम पूर्ण झालेले नाही.
रहमतनगर परिसरात अगदी इरई नदीच्या पात्रातच या योजनेसाठी ट्रीटमेंट प्लॅन्ट उभारण्यात आला आहे. मात्र नदीपात्रात असल्यामुळे तो पावसाळ्यात पाण्याखाली येतो. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एकदा चंद्रपूरच्या दौऱ्यावर आले असताना तेदेखील नदीपात्रात प्लॅन्ट पाहून थक्क झाले होते, हे विशेष. या योजनेचे दुसरे ट्रीटमेंट प्लॅन्ट पठाणपुरा परिसरात आहे. रहमतनगर येथील प्लांट सदोष असल्याने त्याचे काम तिथेच थांबविण्यात आल्याची माहिती आहे. या योजनेचे आणखी बरेच काम शिल्लक आहे. काम पूर्ण झाल्यानंतर योजनेची तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी करणे अनिवार्य आहे. या तपासणीतही ही योजना ‘उत्तीर्ण’ होईल काय, हा प्रश्नच आहे.
विशेष म्हणजे, या उन्हाळ्यात या योजनेतील कोणतेही काम करण्यात आलेले नाही. आता उन्हाळा संपत आला आहे. लवकरच पावसाचे आगमन होईल. त्यानंतर आणखी चार महिने या योजनेचे काम बंदच राहणार आहे.
आणखी वाढविणार पाईपलाईन ?
भूमिगत मलनिस्सारण योजनेच्या फलश्रुतीवर आधीच संभ्रमावस्था आहे. खुद्द नगरसेवकच ही योजना यशस्वी होईल का, हे सांगू शकत नाही. तरीही महानगरपालिकेने नुकत्याच सादर केलेल्या शहर विकास आराखड्यात शहर पुढे आणखी विस्तारित होईल, म्हणून या योजनेची पाईललाईन आणखी काही किलोमीटर वाढविण्याचे प्रस्तावित केले आहे.
विलंबामुळे योजनेची वाढली किंमत
भूमिगत मलनिस्सारण योजनेला प्रारंभ झाला तेव्हा योजनेसाठी ७० कोटींचा खर्च अपेक्षित होता. कामे वेळेत न झाल्याने योजना ९० कोटींवर गेली. आता पुन्हा योजनेची किंमत वाढून ती १०० कोटींच्याही पार गेल्याची माहिती आहे. योजनेचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर आणखी अंदाजपत्रकीय किंमत वाढण्याची शक्यता आहे.