हळदी-कुंकू कार्यक्रमात रोपट्याचे वाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:51 AM2021-02-06T04:51:46+5:302021-02-06T04:51:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिंदेवाही : श्री संताजी महिला संघटनेतर्फे सर्व बचत गटातील महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : श्री संताजी महिला संघटनेतर्फे सर्व बचत गटातील महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रत्येक महिलेला वाण म्हणून रोपटे देण्यात आले.
दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी दिलेल्या रोपट्याचे संगोपन करण्याची हमी उपस्थित महिलांकडून घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या संघटिका अलका कावळे तर प्रमुख पाहुणे म्हणून संगीता भांडेकर, मंदा चकोले उपस्थित होत्या. संघटिका अलका योगराज कावळे यांनी पर्यावरणाविषयी माहिती दिली. मंदा चकोले यांनी स्त्री जीवनावर विचार मांडले. संगीता भांडेकर यांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’ यावरील माहिती महिलांना सांगितली. या कार्यक्रमात उखाणे स्पर्धा, वन मिनिट शो, वैयक्तिक डान्स घेण्यात आले. उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक अलका कावळे. द्वितीय क्रमांक संगीता भांडेकर, तृतीय क्रमांक वीना कावळे यांनी मिळवला. वन मिनिट शो स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्याणी येरणे, द्वितीय क्रमांक सुनीता टिकले, तृतीय क्रमांक अल्का कावळे यांनी प्राप्त केला. डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक रूपा नागोसे, द्वितीय क्रमांक वीना कावळे तर तृतीय क्रमांक गुड्डी भांडेकर यांनी प्राप्त केला. या कार्यक्रमात सर्व स्त्रियांना रोपटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या दिलेल्या रोपट्याची प्रत्येक स्त्रीने निगा राखावी, असे आवाहन सर्व महिलांना करण्यात आले. सूत्रसंचालन वीना कावळे यांनी केले तर छबू नागोसे यांनी आभार मानले.