४.६० लाख हेक्टरवर होणार पिकांची लागवड
By admin | Published: June 21, 2014 11:54 PM2014-06-21T23:54:07+5:302014-06-21T23:54:07+5:30
यंदा जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही, याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे.
कृषी विभागाचे नियोजन : सोयाबीन घटणार; कपाशीचा पेरा वाढणार
चंद्रपूर : यंदा जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही, याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे.
धान हे मुख्य पीक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन व कपाशीसह अन्य पिकेही मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. र्माुत्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा घटणार असून कपाशीच्या पेऱ्यात वाढ होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. तसे नियोजनही कृषी विभागाने केले आहे. सन २०१३-१४ च्या खरीप हंगामात १ लाख ३६ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. यावर्षी मात्र त्यात घट होऊन १ लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. यंदाच्या हंगामात कपाशीच्या पेऱ्यात मात्र वाढ होणार आहे. मागील वर्षी एक लाख ११ हजार ९०० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. यंदा त्यात वाढ होऊन एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
मागील हंगामात तीन हजार १०० हेक्टरवर ज्वारी पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदाच्या हंगामात एवढ्याच क्षेत्रावर ज्वारीची लागवड होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी २०० हेक्टरवर तृणधान्याची लागवड करण्यात आली होती. यंदाही तेवढेच क्षेत्र तृणधान्याने व्यापणार आहे.
मागील हंगामात २९ हजार ४०० हेक्टरवर तूर पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदाही तेवढ्याच क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील हंगामात ३०० हेक्टरवर उडीद पिकाची लागवड करण्यात आली हेती. यंदा उडीदाच्या क्षेत्रात १०० हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज आहे. ४०० हेक्टरवर कडधान्याची लागवड करण्यात आली होती. यावर्षीच्या हंगामात तेवढ्याच क्षेत्रात कडधान्य लावले जाणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये भूईमुगाचे क्षेत्र निरंक आहे.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात ५०० हेक्टरवर तिळाची लागवड करण्यात आली होती. यंदाही तेवढ्याच क्षेत्रावर तिळाची पेरणी केली जाण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात एरंडीचे पीक मात्र घेण्यात येत नाही.
मागील हंगामात एक लाख ३६ हजार ५०० हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली होती. यंदा मात्र सोयाबिनच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. यंदा एक लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबिनची लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात ऊसाच्या पेऱ्यातही घट होऊन १०० हेक्टरवर लागवड होईल.(प्रतिनिधी)