जिल्ह्यात 28 जणांनी केले प्लाझ्मा दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 05:00 AM2020-12-20T05:00:00+5:302020-12-20T05:00:42+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात रक्तदान चळवळीने चांगला जम बसविलेला आहे. आता रक्त प्लाज्मा संक्रमणाच्या कार्यात एक चमू कार्य करीत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य सेवेतील ज्या कोरोना योध्दांना कोरोना झालेला होता, अशा लोकांनी स्वत: पुढे येऊन प्लाज्मा दान केले, आणि आता रक्तदान चळवळ प्रमाणे प्लाज्मा दान चळवळही चंद्रपूर जिल्ह्यात रुजू लागलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणुची लागण झालेल्या गंभीर रुग्णांना लवकर बरे वाटावे म्हणून अगोदर कोरोना होऊन बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा देण्यात येतो. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्लाझ्मा डोनेशन सेंटर सुरू करण्यात आले असून आतापर्यंत २८ जणांनी प्लाझ्मा दान केले आहे.
संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. या अदृश्य पण अत्यंत भीषण विषाणूवर मात करण्यासाठी संपूर्ण जगातील चिकित्सक शर्थीने प्रयत्न करीत आहेत. कोरोना विषाणुची लागण झालेल्या रुग्णांना लवकर बरे वाटावे म्हणून अगोदर कोरोना होऊन बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा देण्यात देण्यात येतो. हा प्लाझ्मा सहज उपलब्ध होऊन इतरांचे जीव वाचावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २९ जूनपासून प्लाझ्मा डोनेशन बँक प्रारंभ केलेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाच्या रक्तसंक्रमण विभागात प्लाझ्मा डोनेशन बँक आहे. कोविडमुक्त झालेल्या नागरिकांनी कन्व्हलसंट प्लाझ्मा दान करण्याकरिता स्वयंस्फूर्तीने समोर येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याला प्रतिसाद देत २८ जणांनी प्लाझ्मा दान केले आहे.
विशेष शिबिराचे आयोजन
चंद्रपूर जिल्ह्यात रक्तदान चळवळीने चांगला जम बसविलेला आहे. आता रक्त प्लाज्मा संक्रमणाच्या कार्यात एक चमू कार्य करीत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य सेवेतील ज्या कोरोना योध्दांना कोरोना झालेला होता, अशा लोकांनी स्वत: पुढे येऊन प्लाज्मा दान केले, आणि आता रक्तदान चळवळ प्रमाणे प्लाज्मा दान चळवळही चंद्रपूर जिल्ह्यात रुजू लागलेली आहे.
कोण करू शकतो प्लाझ्मा दान?
कोविड बाधित होऊन स्वस्थ झाल्यानंतर २८ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेली व्यक्ती प्लाझ्मा दान करू दान शकते. सदर व्यक्तीला बि.पी., शुगर, हृदयरोग आदी गंभीर आजार नसावे. त्याचे वय १८ ते ६० च्या दरम्यान व वजन ६० किलोपेक्षा अधिक असावे. हिमोग्लोबीन १२.५० टक्के पेक्षा अधिक असावे. प्लाझ्मा दिल्यानंतर २४ ते ७२ तासाच्या आत दानदाताच्या रक्तामध्ये प्लाझ्मा भरून निघतो. प्लाझ्मा दान केल्याने कोणतीही शारीरिक कमजोरी येत नाही किंवा रोग प्रतिकारशक्ती कमी होत नाही.
पाच वर्षापर्यंत राहतो सुरक्षित
प्लाझ्मा बँकमध्ये दान करण्यात आलेल्या प्लाझ्मा मायनस ८० डिग्री सेल्सियस तापमानामध्ये पाच वर्षापर्यंत सुरक्षित ठेवता येईल. या बँकमध्ये ए पॉझिटिव्ह रक्तगटाचा चार, बी पॉझिटिव्हच्या १६, ओ पॉझिटिव्हच्या चार, ओ निगेटिव्हच्या दोन आणि एबी पॉझिटिव्हच्या दोन अशा एकूण २८ बॉटल कन्व्हलसंट प्लाझ्मा संग्रहित करण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आजपर्यंत तरी कोणत्याही गंभीर कोरोना रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आलेला नाही.