चंद्रपुरात प्लास्टिक बंदी कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:28 AM2021-07-29T04:28:30+5:302021-07-29T04:28:30+5:30
चंद्रपूर : राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवित अनेकांवर कारवाई केली होती. मध्यंतरी कोरोना ...
चंद्रपूर : राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवित अनेकांवर कारवाई केली होती. मध्यंतरी कोरोना संकटामुळे ही मोहीम थंडावली होती. दरम्यान, जागोजागी व्यावसायिक ग्राहकांना प्लास्टिक देत आहेत. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले असून नागरिकही पर्यावरण संवर्धनाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
राज्यभरात प्लास्टिक बंदीनंतर चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात कारवाई करून महापालिकेने दंड वसूल केला होता. अचानक कारवाई करून दंड वसूल केल्याने काही प्रमाणात प्लास्टिक वापरणे व्यावसायिकांनी बंद केले होते. दुकानदारांकडूनसुद्धा प्लास्टिक नसल्याचे सांगितले जायचे. त्यामुळे चंद्रपूरसह जिल्हाभरात कॅरिबॅगचा वापर बंद झाला होता.
मनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे प्लास्टिक, थर्माकोल, अविघटनशील वस्तूचे वापर व विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये धाड टाकून प्लास्टिकसाठा जप्त केला. तर अनेकांकडून दंड वसूल केला. कोरोना संकटानंतर आता बाजारपेठ सुरू झाली आहे. मात्र, सद्यस्थितीत प्लास्टिक बंदी मोहीम थंडावल्याने पुन्हा कॅरिबॅग बाजारात तसेच दुकानामध्ये आल्याचे दिसून येत आहे. भाजीविक्रेत्यांसह अन्य दुकानातही प्लास्टिक पिशव्या दिल्या जात आहेत.
प्लास्टिक पिशवी बंदीबाबत मनपा प्रशासन तसेच प्रदूषण मंडळातर्फे पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत जागृती झाली नाही. तसेच कारवाईची मोहीमसुद्धा थंडावल्याने जिल्हाभरात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
प्लास्टिमुळे जनावरांना धोका
नद्या-नाल्यांमध्ये प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तसेच जमिनीमध्येही पिशवीचे विघटन होत नसल्याने अनेक प्राणी या पिशव्या खातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका आहे. यामध्ये अनेक जनावरे मृत्युमुखीही पडली आहेत. त्यामुळे आतातरी महापालिका तसेच प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.